

नाशिक (Nashik): राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी २.० योजना राबवली जात आहे. या योजनेतून ‘महावितरण कंपनीच्या माध्यमातून नाशिक परिमंडळात ९३५ मेगावॉट सौरवीज निर्माण होत आहे. ‘महावितरण’च्या १२३ उपकेंद्रांच्या माध्यमातून दिवसा शेतीसाठी ही वीज उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज मिळत असल्याने शेतीला पाणी देण्याच्या समस्येत घट झाली आहे.
महाराष्ट्रात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, याबाबत अनेक वर्षांची मागणी होती. मात्र, सरकारकडून उद्योगांना वीज पुरवठा करण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याने ही मागणी पूर्ण करता येत नव्हती. अखेर सरकारने शेतक-यांची ही समस्या सोडवण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय शोधला. त्यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक वीज उपकेंद्राच्या परिसरात सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू करायचा व तेथे निर्माण होणारी वीज त्या उपकेंद्राच्या अंतर्गत येणा-या कृषी पंपांना पुरवून शेतीसाठी दिवसा वीज पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी- २.० योजना राबविण्यात येते.
या योजनेत शेतकऱ्यांच्या पडीक जागेत तसेच शासकीय जमिनींवर सौरकृषी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यातून उत्पादित वीज महावितरणच्या उपकेंद्रांना जोडण्यात येते. त्यानंतर उपकेंद्रांमधून ही वीज पाच किलोमीटर परिघातील शेतीसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. पडीक जागेवरील सौरप्रकल्पातून संबंधित खातेदारांना जागेचे भाडेही मिळत असल्याने त्यांना अतिरिक्त उत्पन्न सुुरू झाले.
‘महावितरण’च्या नाशिक परिमंडळात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनीला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. परिमंडळात नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांत योजनेंतर्गत १५३ प्रकल्प उभे राहिले. हे प्रकल्प थेट १२३ उपकेंद्रांना जोडण्यात आले असून, त्यातून ९३५ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. त्यात अहिल्यानगर सर्कलमध्ये सर्वाधिक ४१६ मेगावॉट विजेची निर्मिती होते. त्या खालोखाल नाशिक सर्कलमध्ये ३०६, तर मालेगाव सर्कलमधून २१३ मेगावॉट वीजनिर्मितीचे उत्पादन घेतले जाते. ही वीज दिवसा आठ तास शेतीसाठीच उपलब्ध होत आहे.
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनीची वीजनिर्मिती
सर्कल प्रकल्प उत्पादित वीज (मे.वॉ.)
अहिल्यानगर ५४ ४१६
नाशिक ६२ ३०६
मालेगाव ३७ २१३
परिमंडळ १५३ ९३५