

नाशिक (Nashik): नाशिक महानगरपालिकेने प्रस्तावित ट्रक टर्मिनस व रविवार कारंजा येथील बहुमजली वाहनतळ या प्रकल्पांसाठी प्रसिद्ध केलेल्या टेंडरला खूपच कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे या प्रकल्पांसाठी अखेर अनुक्रमे तिसऱ्यांदा व चौथ्यांदा टेंडर प्रसिद्धी करण्याची वेळ आली आहे.
मागील टेंडरमध्ये सहभागी होण्याची मुदत ५ जानेवारी होती. मात्र, १६ जानेवारीपर्यंत महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने आता नव्याने फेरटेंडर प्रसिद्ध केले आहे.
नाशिक महापालिकेने डिझाइन, डेव्हलप, फायनान्स, ऑपरेट अँड मेंटेन (DDFOM) या सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आडगाव येथे ट्रक टर्मिनल व रविवार कारंजा येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आडगाव येथील सध्याच्या जुन्या ट्रक टर्मिनस असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या ३० एकर जमिनीवर १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा हा अत्याधुनिक ट्रक टर्मिनस प्रकल्प उभारला जाणार आहे.
या प्रकल्पात आधुनिक सुविधा असतील आणि तो खासगी एजन्सीमार्फत राबवला जाणार आहे. हा प्रकल्प आगामी सिंहस्थ कुंभ मेळाच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आला असून ट्रक आणि कंटेनर पार्किंगसाठी चालकांना सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. बोलीदारांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी तिसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध केले आहे.
या नव्या टर्मिनसच्या माध्यमातून ट्रक टर्मिनसचे रूपांतर आधुनिक लॉजिस्टिक्स हबमध्ये करण्यात येणार आहे. संबंधित एजन्सीला ट्रक चालकांसाठी या ट्रक टर्मिनसमध्ये चालकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या प्रकल्पात सुमारे ३०० ट्रकसाठी वाहनतळ असणार आहे.
याशिवाय, डेव्हलपर माल लोड-अनलोडसाठी स्टोरेज सुविधा, वे ब्रिज, ट्रक वर्कशॉप, रिटेल आउटलेट्स, ट्रान्सपोर्ट ऑफिसेस, शोरूम, मोटेल, हॉटेल्स आदी सुविधा उभारू शकणार आहे. कंत्राटदाराला ३० वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाची देखभाल करावी लागणार आहे.
बहुमजली वाहनतळाचे चौथ्यांदा टेंडर
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मागणी केल्यानुसार महापालिकेने रविवार कारंजा येथील बहुमजली पार्किंग इमारतीत खालच्या दोन मजल्यांवर व्ययसायिक गाळे बांधण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी तिसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध केले. मात्र, पुरेसे बोलीदार त्यात सहभागी न झाल्याने महापालिकेने चौथ्यांदा टेंडर प्रसिद्ध केले आहे.
नाशिक शहरातील पार्किंगची गंभीर समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने रविवार करंजा येथील यशवंत मंडईच्या जागी प्रस्तावित बहुमजली वाहनतळ प्रस्तावित केला आहे. नाशिक महापालिका सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या या बहुमजली वाहनतळ प्रकल्पाची उभारणी पूर्णपणे खासगी भागीदारी तत्वावर करीत आहे.
या प्रकल्पासाठी नोव्हेंबरमध्ये मागवलेल्या टेंडरला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा टेंडर प्रसिद्ध केले होते.शिवसेनेचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हा प्रकल्प नगरविकास विभागाच्या निधीतून उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्देश न आल्याने महापालिकेने ही टेंडर प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. या टेंडरला प्रतिसाद मिळाल्यास या कामासाठी फेब्रुवारीमध्ये कार्यादेश दिले जाऊ शकतात.