नाशिकच्या अभिनव भारत मंदिरासाठी डीपीसीकडून अडीच कोटी

जिल्हा वार्षिक योजनेतून उर्वरित कामांसाठी प्रशासकीय मान्यता; सावरकरांच्या कार्याची माहिती देणारा होलोग्राम व्हिडिओ व शब्दांचे भित्तिचित्र उभारणार
Nashik DPC
Nashik DPCTendernama
Published on

नाशिक (Nashik): जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ मध्ये पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता अनुदान या लेखाशीर्षाखाली नाशिक येथील अभिनव भारत मंदिरातील उर्वरित कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी दिली आहे. अभिनव भारत मंदिरासाठी यापूर्वीच राज्याच्या पर्यटन विभागाने मंजूर केलेल्या पाच कोटींच्या निधीतून पुनरुज्जिवनाचे काम सुरू आहे. या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Nashik DPC
Nashik ZP Funds: प्रशासकीय सुस्ती की राजकीय हस्तक्षेप? जिल्हा परिषदेचा 91 कोटींचा निधी परत गेल्याने खळबळ

स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या बंधूंनी नाशिकमध्ये आपल्या विद्यार्थी दशेत अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. या क्रांतिकारी संघटनेचे केंद्र असलेल्या अभिनव भारत मंदिराच्या पुनरुज्जिवनाचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामामुळे अभिनव भारत मंदिराच्या उर्वरित विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

Nashik DPC
Nashik ZP: जिल्हा परिषेदच्या सूपर 50 उपक्रमातून फसवणूक; सेसमधून 6 कोटी खर्च

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होलोग्राम व्हिडिओ
होलोग्राम व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, कार्य आणि योगदान समजून घेण्यास व त्याबाबत जाणून घेण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रूढ केलेल्या शब्दांचे भित्तिचित्र (वॉल) उभारण्यात येणार आहे.  

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या ठिकाणी नुकतीच भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी वरील दोन बाबींचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या होत्या. या सूचनांची दखल घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहेत. 

Tendernama
www.tendernama.com