

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या हजारो कोटींच्या कामांमध्ये कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून ३५ कोटी रुपयांचा बनावट कार्यारंभ आदेश (Work Order) तयार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणकडून हजारो कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या जात आहेत. प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशांची मोठी संख्या व कामे करण्यासाठीही हजारो लोक इच्छुक असल्याने त्यात ठग लोकांनी सिंहस्थात कामे मिळवून देण्याच्या नावाखाली ठेकेदारांनी फसवणूक करण्याचा फंडा शोधलेला दिसत आहे.
अशाच एका ३५ कोटींच्या कार्यारंभ आदेशावरील डिजीटल स्वाक्षरी आपली नसल्याचे लक्षात येताच कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळाकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात हजारो कोटींची कामे केली जात आहेत. यातील काही काम मिळावे, यासाठी कुंभमेळा कार्यलयात रोज अनेक लोक चकरा मारत असतात. कुंभमेळा प्राधिकरणाकडून आपल्याला काही काम मिळेल, का याबाबत त्या कार्यालयात काम करीत असलेल्या व्यक्तिंशी ओळखी काढण्याचा प्रयत्न करीत असतात.
मुळात कुंभमेळा प्राधिकरण ही केवळ नियंत्रण करणारी यंत्रणा असून त्या कामांची अंमलबजावणी यंत्रणा या नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक जिल्हा परिषद आदी संस्था असल्याचे लोकांच्या लक्षात येत नाही.
ठेकेदार संस्थांच्या या अज्ञानाचा गैरफायदा काही लोक उठवत असून तुम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्यात कामे मिळवून देतो, अशी आश्वासने देत असतात. मात्र, त्याबाबत अद्याप कागदोपत्री काहीही पुरावे सापडत नव्हते. मात्र, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयात निळकंठ शेवाळे, (रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक) यांनी स्वीयसहायक विजय सोनवणे यांच्याकडे येऊन त्यांच्याकडे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ निमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसविणे, कार्यान्वित करणे व देखभाल करण्याबाबत कार्यादेशाची प्रत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा व देखरेख व्यवस्था पुरविण्याबाबत अधिकृत कार्यादेश व परवानगीपत्र दिले. त्यानंतर त्यांनी ही कागदपत्रे खरी आहेत की बनावट आहेत याची पडताळणी करून घ्यायची आहे, असे सांगितले.
विजय सोनवणे यांनी ती कागदपत्रे कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे कामकाज पाहणारे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांच्याकडे दिली. सोमवंशी यांना त्या दोन्ही कागदपत्रांतील मजकूर, पत्राच्या टायपिंगमधील मार्जिन, प्रकल्पाची मंजूर रक्कम तसेच विभागीय आयुक्त यांच्या डिजिटल स्वाक्षरीमध्ये असलेली विसंगती याबाबत संशय आला. त्यांनी तातडीने याबाबी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनीही या सह्या बनावट व खोट्या असल्याचे ओळखले.
महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे जा. क्र. नात्रंकुप्रा/मुख्यलेख/२०२६/३५ दिनांक १० फेब्रुवारी २०२६ या पत्रामध्ये अभिषेक संजय झरे (संचालक व संस्थापक) इनोव्हेटीव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे रेल्वे स्थानकाजवळ, ठाणे, महाराष्ट्र यांच्या नावे कार्यारंभ आदेश दिले असून त्या पत्राच्या खाली डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तथा विभागीय आयुक्त, नाशिक असे नमूद करून वरती डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचे डॉ. गेडाम यांच्या लक्षात आले.
याशिवाय त्या प्रवीण या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्येही तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे डिजिटल स्वाक्षरी त्यांच्या वापरातील अधिकृत डिजिटल सही नसल्याचे सांगितले. या बनावट कार्यारंभ आदेशाच्या पत्रामध्ये संबंधित कामांची रक्कम ३५ कोटी रुपये दर्शवली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर डॉ. गेडाम यांनी स्वीय सहायक विजय सोनवणे यांना नाशिकरोड पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी प्राधिकृत केले. त्यानुसार विजय सोनवणे यांनी बनावट डिजिटल स्वाक्षरी असलेले दोन खोटी व बनावट कार्यादेशाची कागदपत्रे फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केली म्हणून पोलिसांत तक्रार दिली आहे.
Key Points Summary
३५ कोटींच्या बनावट कार्यारंभ आदेशामुळे नाशिक प्रशासनात खळबळ.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बोगस डिजिटल स्वाक्षरी वापरून फसवणुकीचा प्रयत्न
ठाणे येथील एका एजन्सीच्या नावे एआय आधारित सुरक्षा यंत्रणेचे खोटे पत्र तयार.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या सतर्कतेमुळे मोठा आर्थिक घोटाळा टळला.
अज्ञात आरोपींविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.