Dry Port
Dry PortTendernama

समृद्धी महामार्गालगत 12 ड्रायपोर्ट उभारण्याची सरकारची तयारी

Published on

नाशिक (Nashik): वाढवण बंदरामधून साधारणपणे २०३० पासून निर्यात सुरू होईल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वाढवण बंदराला थेट जोडण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांना गती दिली आहे. त्याचबरोबर निर्यातीसाठीच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.

Dry Port
Nashik: केंद्र - राज्य सरकार संयुक्तपणे उभारणार सिंहस्थ परिक्रमा मार्ग

नाशिक व जालना येथील ड्रायपोर्ट लवकरात लवकर सुरू करण्याबरोबरच समृद्धी महामार्गालगत बारा ड्रायपोर्ट उभारण्याबाबत सरकारकडून अभ्यास सुरू आहे. यामुळे लवकरच समृद्धी महामार्गालगत बारा ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली जाईल, असे सुतोवाच राज्य शासनाचे गुंतवणूक आणि धोरणविषयक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले.

जगभरातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक असलेले वाढवण बंदर उभारण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात असल्याने या बंदराला मध्य व दक्षिण भारत थेट जोडण्यासाठी राज्य सरकारने याआधीच वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भरवीर ते वाढवण असा एक्सप्रेस वे उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता दिली आहे.

Dry Port
Nashik: मुख्यमंत्री फडणवीसांनी कानपिचक्या देऊनही पार्किंगच्या टेंडरला शिवसेनेचा विरोध

केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही मागील वर्षी डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची घोषणा करून सर्वेक्षण करण्यास निधी मंजूर केला होता. समृद्धी महामार्ग ते वाढवण बंदर यांना जोडणारा महामार्ग तयार झाल्यानंतर विदर्भ व मराठवाडा थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार आहेत. यामुळे विदर्भ व मराठवाडा येथील निर्यातवाढीला चालना मिळणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व जालना येथे ड्रायपोर्टची घोषणा केली होती. वेगवेगळ्या कारणांमुळे या दोन्ही ड्रायपोर्टचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. नाशिक येथील ड्रायपोर्ट निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर होत असून अद्याप येथील प्रकल्प भूसंपादन पातळीपर्यंत पोहोचला आहे. जालना येथील ड्रायपोर्ट उभारण्याचे काम सुरू असून सहा महिन्यांमध्ये तेथून निर्यात कामकाज प्रत्यक्षात सुरू होणार आहे. 

Dry Port
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मेगा प्लॅन! टेन्ट सिटी अन् ज्योतिर्लिंग जोडणारी हेलिकॉप्टर सेवा

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला थेट जोडला गेल्यानंतर विदर्भ व मराठवाडा येथून निर्यात करणे अधिक सुलभ व सोईचे होणार आहे. यामुळे समृद्धी लगत निर्यात सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने समृद्धी महामार्ग जात असलेल्या जिल्ह्यांमध्ये समृद्धीलगत ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारने केलेल्या पाहणानुसार समृद्धी महामार्गालगत १२ ड्रायपोर्ट उभे राहू शकतात. यामुळे सरकार पुढील सहा महिन्यांत या १२ ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा करण्याची शक्यता धवसे यांनी व्यक्त केला.

सरकार भविष्यात समृद्धी महामार्ग जात असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्यातक्षमता असलेले उद्योग उभारण्यासाठी चालना देणार असून त्या उद्योगांना या ड्रायपोर्टवरून निर्यात करणे सोईचे होणार आहे. याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर परिसरात १ हजार एकरांमध्ये ड्रगपार्क स्थापन होईल, असे धवसे यांनी सांगितले.

Tendernama
www.tendernama.com