नाशिक (Nashik) : इगतपुरी तालुक्यातील धामणी शिवारात नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे कामसाठी करण्यात आलेल्या स्फोटांमुळे महामार्गापासून शंभर मीटरवरील घरांचे मोठे नुकसान होत आहे. नुकसान भरपाईसाठी या शेतकरी कुटुंबांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे काम करणार्या कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नुकार दिला आहे. यामुळे या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र, महामार्गापासून दोनशे मीटर परिसरात उपोषण करण्यात पोलीस प्रशासन परवानगी देत नाहीत. यामुळे नुकसानीची भरपाईही द्यायची नाही व उपोषणाला परवानगीही द्यायची नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गचे इगतपुरी तालुक्यातील टप्प्याचे काम पुण्यातील राज इन्फ्रा ही कंपनी करत आहे. या कामामुळे इगतपुरी तालुक्यातील धामनी गावाजवळील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घरे या महामार्गापासून शंभर मीटरच्या आत असून या कामासाठी स्फोट घडवले जात असल्याने तेथील रहिवाशांच्या घरांना तडे गेले आहेत. नुकसान भरपाईसाठी उत्तम भोसले व धनंजय भोसले यांनी दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी उपोषण केले होते. त्यावेळी इगतपुरी तहसीलदार, घोटी पोलिस व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घरांच्या नुकसानींचे मूल्यामापन करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.
संबंधित विभागांच्या अभियंत्यांकडून घरांचे मूल्यमापन करून घेऊन रहिवाशांनी रस्ते विकास महामंडळ व राज इन्फ्रा कंपनीला ते अहवाल सादर केले. मात्र, आता राज इन्फ्रा कंपनी रस्ते विकास विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास हात वर केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून आता रंजना भोसले, वैशाली भोसले, कलाबाई भोसले,सिंधूबाई भोसले, संगीता लाड, सोनाली लाड, हिराबाई भोसले, मीराबाई भोसले यांच्यासह ९६ शेतकरी महिलांनी उपोषण करण्यास परवानगी मागण्यासाठी पत्र दिले आहे.
दरम्यान या नागरिकांना परवानगी देण्याऐवजी घोटी पोलिसांनी ग्रामस्थांना नोटीस काढून महामार्गापासून २०० मीटरच्या आत उपोषणाला बसण्यास मज्जाव केला आहे. मात्र, महामार्गापासून आमची घरे १०० मीटरच्या आत असताना स्फोट घडवून त्यांचे नुकसान करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे का, असा संतप्त प्रश्न या रहिवाशांकडून विचारला जात आहे. स्थानिक पोलिस प्रशासन व तहसील प्रशासन वेगळे नियम सांगून उपोषणाबाबत ग्रामस्थांवर दडपशाही करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी १०० मीटरवर घरे आहेत. मग ग्रामस्थांना उपोषण करण्यासाठी का अडचणी निर्माण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.