Malegaon : 499 कोटीचे टेंडर दिले 610 कोटींना; माजी आमदारांचा भ्रष्टाचाराचा आरोप
नाशिक (Nashik) : मालेगाव महापालिकेने केद्र सरकारच्या अमृत टप्पा दोन योजनेतून भूमिगत गटार योजनेचे टेंडर २२ टक्के अधिक दराने मंजूर केले आहे. यामुळे ४९९ कोटींच्या कामासाठी महापालिकेला ६१० कोटी रुपये मोजावे लागणार असून या वाढीव रकमेचा भूर्दंड महापालिकेला सोसावा लागणार आहे. वाढीव दराचे टेंडर मंजूर करण्यातून ११० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असिफ शेख यांनी केला आहे. महापालिकेने टेंडर सादर केलेल्या कंपनीशी वाटाघाटी करून दर कमी करावेत अथवा हे टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी. अन्यथा न्यायालयात व रस्त्यावर लढा दिला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या 'अमृत योजना टप्पा दोन' अंतर्गत मालेगाव शहरात ५६ किमीची भुयारी गटार योजना राबवली जात आहे. यासाठी मालेगाव महापालिकेने राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. टेंडर भरण्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने तब्बल चार महिन्यांनी तांत्रिक लिफाफा उघडला. त्यात एलोरा व अंकिता या दोन ठेकेदार कंपन्या अपात्र ठरल्या.
उर्वरित दोन कंपन्यांमध्ये ईगल (कल्याण-उल्हासनगर) या कंपनीने ४२ टक्के वाढीव दर भरले असल्याने २२ टक्के वाढीव दर भरलेल्या नागपूर येथील इण्डो इंजिनिअरिंग प्रोजेक्ट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे टेंडर मंजूर करण्यात आले. यामुळे महापालिकेला ४९९ कोटी रुपयांचे काम करण्यासाठी ६१० कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. सहभागी पात्र कंपन्यांनी वाढीव दराने टेंडर भरल्याचे उघडकीस आल्यानंतर टेंडर समितीने टेंडर प्रक्रिया रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्यांनी वाढीव दर मान्य केल्याने संपूर्ण संपूर्ण टेंडर प्रक्रियाच संशयास्पद असल्याची शंका शेख यांनी उपस्थित केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.