
चिंचवड (Chinchwad) : मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांमधील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत असून नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप करून काँक्रिटीकरणावर भर दिला जात आहे.
या चुकीच्या धोरणांविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंचवडगावातील चापेकर चौकात मानवी साखळी करत निषेध नोंदवला. सांडपाणी शुद्धीकरणाऐवजी अनावश्यक सुशोभीकरण केले जात असून प्रशासनाने त्वरित जबाबदारी स्वीकारून पर्यावरणपूरक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
पर्यावरण कार्यकर्ते गणेश बोरा म्हणाले, ‘‘नद्यांचे शुद्धीकरण करून त्यांना नैसर्गिक स्वरूपात पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. मात्र, झाडे तोडून काँक्रिटच्या भिंती आणि जॉगिंग ट्रॅक बांधले जात आहेत. ही विकासाची चुकीची संकल्पना असून भविष्यात यामुळे तापमानवाढ आणि पाणी टंचाईसारख्या समस्या निर्माण होतील. नागरिकांनी वेळीच विरोध केला नाही; तर त्याचा मोठा फटका पुढील पिढ्यांना बसणार आहे.’’
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘नदीतील प्रदूषण वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्वचारोग, श्वसनाचे विकार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही; तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.’’
स्थानिक नागरिक सागर चिंचवडे म्हणाले, ‘‘मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांशी अनेक श्रद्धा आणि परंपरा जोडलेल्या आहेत. परंतु, अनियोजित सुधार प्रकल्पांमुळे या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने काम सुरू ठेवले; तर भविष्यात पूर, पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसणार आहे.’’
तुषार शिंदे म्हणाले, ‘‘नद्यांमध्ये सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी प्रशासन फक्त सौंदर्यीकरणावर भर देत आहे. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होऊनही प्रदूषणाचा प्रश्न सुटत नाही, हे दुर्दैवी आहे.’’
आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘‘शहराचा विकास आवश्यक आहे. मात्र, तो निसर्गपूरक आणि शाश्वत असायला हवा. अनियोजित काँक्रिटीकरणामुळे भविष्यात पूर, पाणीटंचाई आणि उष्णतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्वरित सुधारित धोरण राबवले पाहिजे. नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करणार आहे. या प्रकल्पाची फेरतपासणी करुन सांडपाणी शुद्धीकरणास प्राधान्य देण्याची भूमिका राहील.’’