
पुणे (Pune) : ‘‘पुणे शहराला दुसऱ्या विमानतळाची गरज आहे,’ इथपासून ते ‘पुरंदर विमानतळ होणारच,’’ इथपर्यंत गेल्या आठ वर्षांत अनेकदा घोषणा झाल्या. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निधीची तरतूद करून भूसंपादनाचे काम सुरू करणे यावर विमानतळाचे गाडे आडून बसले आहे. आज (सोमवारी) राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यात विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार का, यावर विमानतळ होणार की नाही, हे ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच विमानतळ प्राधिकरण, संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदिल दाखविला. तेव्हा भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याबरोबरच प्रशासकीय तयारीदेखील पूर्ण झाली. केवळ भूसंपादनासाठीचा निर्णय प्रलंबित होता. मात्र गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पर्यायी जागेचा प्रस्ताव पुढे आला. केंद्र सरकारकडून त्याला प्रथम मान्यता आणि नंतर दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदरच्या जागेवर शिक्कामोर्तब केले व जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पुणे शहरासाठी विमानतळाची गरज बोलून दाखविली,’ तर जेजुरीत जाऊन एका कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.’ त्यापाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावू,’’ असे सांगितले होते. त्यामुळे घोषणांपलीकडे कोणतीही प्रगती झाली नाही.
... तर केवळ राजकीय सोय
पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने १९९५ नंतर प्रथमच केंद्रात पुण्याला नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद मिळाले. त्यांच्या निवडीने पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली. त्यालाही वर्ष होत आले. अजूनही चर्चेच्या पातळीवर हा विषय रेंगाळत आहे. दरम्यान, सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात पुरंदरच्या नियोजित विमानतळाच्या भूसंपादनासाठी तरतूद होणे अपेक्षित आहे. ही तरतूद झाली, तर विमानतळाचे काम सुरू होणार आहे. अन्यथा विमानतळ हा केवळ राजकीय सोयीसाठी असल्याचे स्पष्ट होणार आहे.
- पुरंदर विमानतळासाठी एकूण जागेची आवश्यकता : 2 हजार 832 हेक्टर
- कोअर विमानतळासाठी : 1100 हेक्टर जागा
- कार्गो, पार्किंग बे आणि हॉटेल आदींसाठी : 1250 हेक्टर
- विमानतळासाठी अपेक्षित खर्च : १४ हजार कोटी रुपये (तीन वर्षांपूर्वीचा खर्च)
कोणत्या गावातील किती क्षेत्र जाणार
- वनपुरी : 339 हेक्टर
- कुंभारवळण : 351 हेक्टर
- उदाची वाडी : 261 हेक्टर
- एखतपूर : 271 हेक्टर
- मुंजवडी : 143 हेक्टर
- खानवडी : 484 हेक्टर
- पारगाव : 1037 हेक्टर
एकूण क्षेत्र 2 हजार 832 हेक्टर