
पुणे (Pune) : पुणे जिल्ह्यातील सांडपाणी प्रकल्पांसाठी जिल्हा परिषदेने (Pune ZP) २१ कोटी ३० लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यातून दहा गावांमधील प्रकल्पांची कामे प्रस्तावित केली आहेत. सात हजारांहून लोकसंख्या असलेल्या गावांची निवड केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण भागांमध्ये शहरीकरण वाढू लागले. विशेषतः शहरालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या इमारती उभ्या राहिल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींवर सर्व व्यवस्थेचा ताण येऊ लागला आहे. या वाढत्या शहरीकरणामध्ये गावाला घनकचरा आणि सांडपाण्याचा मोठी समस्या भेडसावत आहे.
गावात तयार होणारा कचरा कसा गोळा करायचा? त्याची विल्हेवाट कोठे लावायची? याबाबत ठोस उपाययोजना नसल्यामुळे गावाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. त्याच पद्धतीने गावांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था न लावल्याने अनेकदा रस्त्यावर पाणी येऊन दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता असते.
रोगराईला आळा घालणे आणि गावातील स्वच्छतेसाठी सांडपाणी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात चार, हवेली, इंदापूर, शिरूर तालुक्यांत प्रत्येकी दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही सांडपाण्याची समस्या वाढत आहे. गावस्तरावर सद्यःस्थितीत योग्य सांडपाणी व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता गावात उघड्यावर सोडले जात आहे. ज्यामुळे गावातील पाण्यात प्रदूषण वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
या गावांची लोकसंख्या जास्त असल्याने सांडपाणी प्रकल्प उभारून गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रस्तावामध्ये जिल्हा परिषदेने नमूद केले आहे. त्याचबरोबर सात हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि जागा उपलब्ध असलेल्या दहा गावांची निवड केल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.