
पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच्या ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. मात्र टायगर दरीत ‘केबल स्टेड’ पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी पाच महिन्यांचा अवधी लागणार आहे.
पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुलाच्या कामात अडथळा येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परिणामी ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी वाहनचालकांना आणखी किमान पाच महिने वाट पाहावी लागणार आहे.
द्रुतगती मार्गावरच्या ‘मिसिंग लिंक’वरील सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्याला जोडणाऱ्या टायगर दरीतील ‘केबल स्टेड’ पुलाचे काम अद्याप सुरूच आहे. स्टेड पुलाचे सुपर स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले. मात्र केबलचे काम राहिले आहे.
जमिनीपासून सुमारे १३२ फूट उंचीवर हा पूल बांधला जात आहे. दरीतील सुसाट वारा व सुरू असलेला पावसाचा मारा, यामुळे कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे. परिणामी काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
‘एमएसआरडीसी’ प्रशासनाने यापूर्वी २५ ऑगस्टपर्यंत मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आता नोव्हेंबर २५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. बोगदा व केबल स्टेडपूल असे दोन भागांत हे काम सुरू होते. पैकी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
मिसिंग लिंक पूर्ण होताच प्रवासाचा वेळ किमान २५ मिनिटांनी वाचणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार ६९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
फायदा काय?
- पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होईल
- तीक्ष्ण वळण कमी होतील, परिणामी अपघातांचे प्रमाण कमी
- घाटात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल
मिसिंग लिंकच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र दरीतील पुलाचे काम हे आव्हानात्मक परिस्थितीत सुरू आहे. पाऊस व वारा यामुळे कामास विलंब होत आहे, मात्र तरीदेखील काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई