
पुणे (Pune) : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी सात गावांमधील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सोमवारपासून (ता. ९) सुनावणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी दिली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावातील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘विमानतळासाठी आरक्षित जागा’ असे शिक्के यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून मारण्यात आले आहेत.
त्याबरोबरच भूसंपादनाबाबत जमिनींच्या मालकांना नोटिसा देखील बजाविण्यात आल्या आहेत. त्या नोटिशीनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २९ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
या मुदतीत २ हजार ५२ शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यावर सुनावणीची प्रक्रिया सोमवारपासून प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन अधिकाऱ्यांकडून सुनावणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भूसंपादन तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी त्या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. तीन मे रोजी जमिनीचे ड्रोन सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांनी आंदोलन करीत त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे सर्वेक्षण थांबविण्यात आले होते. अद्याप सर्व्हेक्षण सुरू झालेले नाही.