
पुणे (Pune) : पावसाळ्यापूर्वी शहरातील गल्लीबोळांत डांबरीकरण करणे, खड्डे बुजविण्याच्या कामाला महापालिकेच्या पथ विभागाने व क्षेत्रीय कार्यालयाने गती आणलेली आहे. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचेही समोर आलेले आहे. विशेषतः मध्यवर्ती पेठांमध्ये डांबराच्या ढिगळांची (पॅचवर्क) व्यवस्थित दबाई केली जात नाही. त्यामुळे खडबडीत ढिगळांमुळे दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. शनिवार पेठेत हसबनीस बखळ येथे डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत रस्ता उखडला गेला. त्यामुळे दुसऱ्यांदा रिसर्फेसिंग करण्याची नामुष्की ओढावली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने पथ विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तसेच पाऊस सुरू असताना रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविण्याची कामे केली तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात होते. हवामान विभागाने या वर्षीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला, तसेच १२ दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी ६५ कोटी
- पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पथ विभागाने एप्रिल महिन्यापासून तयारी करत ६५ कोटींच्या कामांना मान्यता दिली
- रस्ते रिसर्फेसिंग करणे नऊ कोटी, खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स आणि हॉटमिक्स खरेदीसाठी एक कोटी
- जेट पॅचरसाठी पाच कोटी, खोदाईनंतर रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी दोन कोटी ४० लाख
- तातडीची खड्डे दुरुस्तीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी एक कोटी १० लाख रुपये मंजूर
रस्ता उखडल्याचे खापर पाण्यावर
शनिवार पेठेत हसबनीस बखळ येथे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी १०० मीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. हा रस्ता किमान तीन वर्षे तरी सुस्थितीत राहणे आवश्यक होते. पण मे महिन्यात झालेल्या पावसानंतर या रस्त्याची चाळण झाली. डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर खडी पसरली, छोटे-छोटे खड्डे पडले. साधना मासिकाच्या कार्यालयासमोर भला मोठा खड्डा पडला होता. पथ विभाग आणि कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर पावसाचे पाणी साचल्याने रस्ता उखडल्याचे अधिकारी सांगत आहेत.
काम उरकण्यावर भर
प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. ही कामे करताना व्यवस्थित डांबरीकरण करणे, त्याची दबाई करणे आवश्यक आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी देखील रस्त्याच्या बाजूने व्यवस्था करणे आवश्यक आहे, पण तसे काम न करता गडबडीत डांबर रस्त्यावर अंथरले जात असून काम उरकण्यावर भर दिला जात आहे.
पॅचवर्क चुकीच्या पद्धतीने
रस्त्याला खड्डे पडल्यानंतर पॅचवर्क करून खड्डे बुजविले जातात. पण यासाठी खड्ड्यातील माती, खडी काढणे, झाडून स्वच्छ करणे, चौकोनी खड्डा भरून घेऊन त्याची सीमा सील करणे, पांढरी पावडर टाकणे आवश्यक आहे. पण सध्या थेट डांबर टाकून खड्डे बुजविण्याच्या कार्यपद्धतीला फाटा दिला जात आहे. अभियांत्रिकीच्या नियमानुसार हे काम केले जात नसतानाही अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पेठेतील रस्त्यांची दुरवस्था
शहरातील बारा मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची जबाबदारी पथ विभागाकडे आहे. त्यापेक्षा यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. पण छोटा रस्त्यांवर देखील पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील बहुतांश रस्ते हे बारा मीटरपेक्षा कमी रुंदीचे आहेत. या रस्त्यांवर वारंवार पॅचवर्क केल्याने रस्ते समपातळीमध्ये नाहीत. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, चेंबर खचलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही.
हसबनीस बखळ येथे पंधरा दिवसांपूर्वी रस्ता केला होता त्या ठिकाणी खड्डे पडल्याने पुन्हा एकदा तो डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तसेच काही भाग शिल्लक असून तोदेखील पूर्ण केला जाईल. रस्ते डांबरीकरण करताना चांगल्या दर्जाचे होतील याकडे लक्ष दिले जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
दृष्टिक्षेपात
- शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - २१०० किलोमीटर
- सिमेंट रस्ते - ४०० किलोमीटर
- डांबरी रस्ते - ९०० किलोमीटर
- समाविष्ट गावातील रस्ते - ७०० किलोमीटर
- पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणासाठी निधी - ६५ कोटी