
मुंबई (Mumbai) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Mumbai Nagpur Samruddhi Expressway) ठाणे जिल्ह्यातील आमणे ते नाशिकमधील इगतपुरी दरम्यानचा ७६ किमीचा अखेरचा टप्याचे लोकार्पण आज (गुरुवारी, 5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका विशेष सोहळ्यात होत आहे. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल.
समृद्धी महामार्गामुळे मुंबईहून जातांना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या प्रवासातील अंतर कमी आणि वेगवान झाले आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जातांना ३ तास ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे २ तास ३० मिनिटे इतका कमी झाला आहे.
म्हणजेच १ तास २० मिनिटे वाचून सूमारे ४० किमी. अंतर कमी झाले आहे. ७.७४ किमीच्या शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या वाशाळा येथील बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणे अतिशय सोपे झाले आहे. ३६ मीटरची रुंदी आणि ६ पदरी महामार्गामुळे प्रवास जलद होणार आहे.
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, इगतपुरी-आमणे या उर्वरित टप्प्याचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते. आता हा मार्ग सुरू झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांशी असलेली मुंबईची जोड अधिक जलद, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग आहे. दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना हा महामार्ग जोडत जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर ८ तासांत पूर्ण करता येणार आहे.
समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकंक्षी प्रकल्प असून महाराष्ट्राला जोडणारा आणि हजारो व्यक्तींसाठी वाणिज्य, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासासाठी जीवनरेखा म्हणून काम करणारा एक्सप्रेस वे आहे. दहा जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले असून यामुळे कमी वेळात गतीमान प्रवास करण्यासाठीची अतिशय उपुयक्त सुविधा उपलब्ध झाली आहे.