
नाशिक (Nashik) : बहुप्रतिक्षित ठाणे ते नागपूर असा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Mumbai Nagpur Samruddhi Expressway) पूर्ण झाला असून, यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडणारा हा महामार्ग राज्यासाठी आर्थिक महामार्ग ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. हा महामार्ग देशातील सर्वोत्तम प्रकल्प असून यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील ७६ कि.मी. अंतराच्या टप्प्याचे लोकार्पण आणि सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर नेते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हे महायुतीचे स्वप्न होते आणि ते अंतिम टप्प्यातील लोकार्पणामुळे पूर्णत्वास गेले आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा कॉरिडॉर असून यामुळे २४ जिल्ह्यांच्या विकासातून राज्याला आर्थिक चालना मिळणार आहे. ७०१ कि.मी. अंतराचा हा महामार्ग देशात ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’चा सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरेल. औद्योगिक, कृषी आणि पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगिण विकासाला गती मिळणार आहे.
राज्याचा विकास साधत असताना, समृद्धी महामार्ग व पालखी मार्गावर ३३ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच वन्यजीवांना नैसर्गिकरित्या वावरता यावे, यासाठी बोअर व अंडरपास मार्ग करण्यात आलेले आहे. मिसिंग लिंकचे काम लवकरच सुरू केले जाणार असून पादचाऱ्यांसाठीही स्वतंत्र मार्ग या महामार्गावर आहेत.’’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘समृद्धी महामार्गावर २०० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात असून ३५ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प सुरूही झाला आहे. तसेच, या महामार्गावर एक हजार शेततळी बांधली जाणार आहेत. महामार्गावरील प्रत्येक ५०० मीटरवर जलपुनर्भरणाचीही व्यवस्था केल्याने जमिनीचा पाण्याची पातळी वाढली आहे.
भविष्यात बोगद्यामध्ये अपघाती घटना घडली तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेस्क्यु ऑपरेशन राबविण्यासाठी अंतर्गत जोड बोगदेही (इंटरलिंक) आहेत. समृद्धी महामार्गावरील टोलप्रणाली इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिमशी जोडल्याने वाहनचालकाला टोलप्लाझावर थांबण्याची आवश्यकता नाही. या महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करीत सुमारे ५५ हजार ३३५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.’’
समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इगतपुरी बोगद्याजवळील कोनशिलेचे उद्घाटन केल्यानंतर तिघांच्याही हस्ते लालफित कापून महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर इगतपुरी ते आमने व आमने ते इगतपुरी या बोगद्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
मुंबई ते नागपूर गॅस पाइपलाइन
समृद्धी महामार्गामुळे विदर्भाला औद्योगिक विकासाची कवाडे खुली झाली आहेत. ‘गेल’ या कंपनीच्या माध्यमातून या मार्गावर गॅस पाइपलाइन टाकली जाणार आहे. गडचिरोलीला स्टील इंडस्ट्री येत्या काळात उभी राहत असून त्यासाठी या पाइपलाइनचा मोठा फायदा होणार आहे. गॅस पाइपलाइन झाल्यास कोळशाचा वापर बंद होऊन पर्यावरणाची हानी टाळता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
एकमेव फायर सिस्टिम महामार्ग
देशभरातील एकाही बोगद्यामध्ये अग्निशमन यंत्रणेची सुविधा नाही. परंतु समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीच्या व उंचीच्या बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रणालीची फायर सिस्टिम सुविधा उभारण्यात आलेली आहे. यामुळे बोगद्यात आगीची घटना घडल्यास क्षणात ही यंत्रणा कार्यान्वित होऊन त्या आपत्कालिन परिस्थितीवर मात करता येणार आहे.
पर्यावरणपूरक महामार्ग : एकनाथ शिंदे
‘‘समृद्धी महामार्ग गेमचेंजर प्रकल्प ठरला आहे. नागपूर ते मुंबई प्रवास आठ तासांत होणार असल्याने यामुळे विदर्भासह नाशिकला विकासाच्या मार्गावर नेणारा हा महामार्ग आहे. इको सिस्टिमच्या दृष्टीकोनातून उभारलेला हा महामार्ग ‘ॲक्सेस कंट्रोल ग्रीड’ ठरला आहे. हा महामार्ग होऊ नये यासाठी अनेकांनी खोडा घालण्याचाही प्रयत्न केला होता,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देवेंद्रजींचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ : अजित पवार
‘‘समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीत झाली आणि पूर्णत्वासही त्यांच्याच कारकिर्दीस गेला. हे भाग्य सहसा कोणाच्या नशिबी नसते. या महामार्गालगत ३३ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहेच. पण याशिवायही दरवर्षी २५ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असून, या पंचवार्षिक काळात १०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
फडणवीस-शिंदेंना कोपरखळी
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी इगतपुरी-कसारादरम्यानच्या आठ किलोमीटर लांबीच्या बोगद्याची पाहणी केली. या वेळी जाताना एकनाथ शिंदे ड्रायव्हिंग सीटवर, तर त्यांच्या बाजूला फडणवीस बसले होते. अजित पवार हे मागच्या सीटवर होते. बोगदा पाहून येताना ड्रायव्हिंग सीटवर फडणवीस आणि त्यांच्या बाजूला शिंदे होते. अजित पवार मागेच बसले होते. हाच संदर्भ पकडून त्यांनी ‘मी मागून बघतोय कोण काय करतोय, माझं चांगलं लक्ष आहे,’ अशी कोपरखळी मारली, तेव्हा उपस्थितांना हसू आवरले नाही.
मार्ग तत्काळ वाहनांसाठी खुला
समृद्धी मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा मार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नागपूर दिशेकडून आलेली वाहने कसारा घाटाकडे न जाता सुसाट ‘समृद्धी’वरून मुंबईच्या दिशेने रवाना होत होती.
दृष्टीक्षेपात...
- खर्च : ५५ हजार ३३५ कोटी रुपये
- लांबी : ७०१ किमी.
- लहान पूल : ३१७
- अंडरपास : २२९
- बोगदे : ५९
वैशिष्ट्ये
- देशातील सर्वात मोठा बोगदा इगतपुरी ते आमने
- ‘गेल’च्या माध्यमातून मुंबई ते नागपूर गॅस पाईपलाईन
- १० जिल्हे, २६ तालुके, ३९२ गावे जोडली जाणार
- अंतिम टप्प्यातील बोगदा आठ किमीचा सर्वांत मोठा बोगदा
- इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या आठ मिनिटांत
प्रकल्पपूर्तीचे टप्पे
- पहिला टप्पा ५२० कि.मी. (नागपूर ते शिर्डी)
- दुसरा टप्पा ८० कि.मी. (शिर्डी ते भरवीर नाशिक)
- तिसरा टप्पा २५ कि.मी (भरवीर ते इगतपुरी)
- अंतिम टप्पा ७६ कि.मी. (इगतपुरी ते ठाणे)