
पुणे (Pune) : विकास आराखड्यात रस्ता दाखविल्यानंतर ती जागा प्रत्यक्षात ताब्यात आल्यानंतर महापालिकेकडून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले जाते. मात्र, धायरीत एक अजब प्रकार समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने जागा हस्तांतरित केली नाही, त्यास ‘टीडीआर’ देण्याची फाइल अद्याप मंजूर नाही. पण या इमारतीला खेटून तब्बल ४१ लाख रुपये खर्चून रस्ता तयार केला जात आहे. हा रस्ता नेमका कोणाच्या उपयोगाचा आहे, असा प्रश्न पडला आहे.
धायरी आणि परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात धायरीसाठी मॉकडोनॉल्ड ते सावित्री गार्डन असा पर्यायी रस्ता दाखविण्यात आला. याठिकाणी महापालिकेने आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत. पण अजूनही याठिकाणी जागेची मोजणी, रस्त्याची आखणी अंतिम होऊ शकली नाही. हा पर्यायी रस्ता लवकर करावा, अशी मागणी असूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पण धायरीकरांसाठी उपयुक्त नसलेल्या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
धायरीतील गल्ली क्रमांक २१ ‘अ’मध्ये महापालिकेने रस्त्याचे काम सुरू केले. हा विकास आराखड्यातील रस्ता आहे, पण रस्त्याचे काम करताना तेथे ठेकेदाराने माहिती फलक लावला नाही. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्याच्याभोवती पत्र्याचे कुंपण असून, ते न काढल्याने तेथे महापालिकेच्या रस्त्याचे काम सुरू आहे का, हेसुद्धा लक्षात येत नाही. ही जागा अजून महापालिकेला हस्तांतरित झाली नसतानाही पथ विभागाने ४१ लाख रुपयांची निविदा काढून सुमारे २०० मीटर रस्त्याचे काम सुरू केले. पण त्याचा उपयोग नागरिकांना होणारच नाही. असे असताना हा रस्ता कोणासाठी केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘संबंधित जागा मालकाने ‘टीडीआर’साठी फाइल टाकली असून, ती जागा ताब्यात मिळणार आहे.’’ पण जागा ताब्यात येण्यापूर्वीच काम सुरू झाल्याबद्दल ते काही सांगू शकले नाहीत. ‘‘या रस्त्याच्या कामाची माहिती देणारा फलक लावला जाईल, तसेच पत्रेही काढून टाकले जातील. हा रस्ता नागरिकांच्या वापरासाठी असणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
महापालिकेने नागरिकांच्या हिताची कामे करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. पण ज्या रस्त्याचा वापर नागरिकांसाठी होणार नाही, त्याचेच काम प्राधान्याने केले आहे. हा रस्ता कोणाच्या हिताचा आहे?
- महेश पोकळे, विभागप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष