
पुणे (Pune) : पुणे शहरासह राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असलेल्या मार्गावर ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात ३७, तर राज्यात १०३७ ब्लॅक स्पॉट आढळून आले आहेत. पुणे शहराच्या चारही बाजूने असणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश आहे. ‘पीपीपी’ मॉडेल अंतर्गत हे काम केले जाईल. येत्या काही दिवसांत यासाठीचे टेंडरदेखील राज्य सरकार मागविणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ची यंत्रणा कार्यान्वित केल्यावर तेथील रस्ते अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या परिवहन विभागाने अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या सर्व रस्त्यावर ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-अहिल्यानगर आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला. या रस्त्यावर असणाऱ्या ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सेन्सर व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. यासाठी नियंत्रण कक्षदेखील स्थापन केले जाणार आहे. तेथून संबंधित रस्त्यावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.
या ठिकाणी असणार नियंत्रण कक्ष
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदींसह सहा ठिकाणी ‘आयटीएमएस’चे नियंत्रण कक्ष स्थापन केले जाणार आहे. या नियंत्रण कक्षाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीवर या कक्षाच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल. अपघात घडल्यास त्या ठिकाणी तत्काळ मदत पोचविण्याचे कामदेखील याच माध्यमातून केले जाईल.
असा आहे फायदा
- निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर अंकुश
- लेन तोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसेल
- रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई
- वाहतुकीची शिस्त राखली जाईल
- पथकर वसुली जलद, अचूक तसेच पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत
‘आयटीएमएस’ म्हणजे काय?
- ‘आयटीएमएस’ म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम. याद्वारे वाहतुकीचे नियंत्रण केले जाते
- या प्रणालीत ड्रोनचाही वापर होतो
- मार्गावर व महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवण्यात येते
- प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाते
- अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत
- संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल
- हे कॅमेरे लेन तोडणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. यात शहरापासून ते राष्ट्रीय महामार्गाचादेखील समावेश आहे. ‘पीपीपी’ तत्त्वानुसार ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी तसेच सर्वच रस्त्यावर ‘आयटीएमएस’ काम करेल.
- भारत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई