
मुंबई (Mumbai) : पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या टेंडरमध्ये लोअर बिडर ठरलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL), नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (NECL), जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GRIL), पीएनसी (PNC) इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा (RSIIL) या बलाढ्य कंपन्यांना लवकरच वर्क ऑर्डर मिळणार आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेत ही प्रक्रिया रखडली होती.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे व पिंपरीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. एमएसआरडीसीने प्रकल्पाच्या ९ बांधकाम टेंडरसाठी कमर्शियल टेंडर उघडल्यानंतर सर्वात कमी बोलीदार म्हणून या कंपन्यांची घोषणा केली होती. १३६ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. पुणे रिंगरोड हा एमएसआरडीसीद्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून ९ पॅकेजेस अंतर्गत केले जाईल. एमएसआरडीसीने जानेवारी २०२४ मध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह कमर्शियल टेंडर आमंत्रित केले होते. एप्रिल २०२४मध्ये या १२ कंपन्यांकडून २६ टेंडर प्राप्त झाली होती.
राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले होती. निवडणूक आचारसंहिता काळात टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन आता आचारसंहिता संपुष्टात येताच वर्क ऑर्डर कंत्राटदारांना दिली जाणार आहे. पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९,९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२,७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. दोन टप्प्यात रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस टक्के जादा दराने टेंडर आल्याचे उघडकीस आले होते. त्रयस्थ संस्थेमार्फत टेंडरची छाननी करून घेतल्यानंतर आणि पात्र कंपन्यांशी तडजोड करून वीस ते पंचवीस टक्के जादा दराने काम देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
कसा असेल रिंगरोड -
बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
एकूण लांबी : १३६ किलोमीटर
एकूण रुंदी :११० मीटर
पूर्व रिंगरोड : ७१.३५ किमी
पश्चिम रिंगरोड : ६५.४५ किमी