
पुणे (Pune) : खेड तालुक्यातील पाच रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा ३५ टक्के कमी दराने (बिलो टेंडर) भरल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडली आहेत. त्यामुळे नागरिक, कामगार, उद्योजकांसह शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ही कामे लवकर व्हावीत अशी मागणी होत आहे. दरम्यान, पीएमआरडीएने या ठेकेदारांकडून खुलासे मागितले आहेत. तसेच बाबनिहाय दर पृथ:करण देण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सात दिवसांची मुदत दिली आहे.
खेड तालुक्यातील धामणेफाटा ते कोये (जिल्हा परिषद शाळा) दोन किलोमीटर रस्ता, कोहिंडे फाटा ते कडूस हा पाच किलोमीटरचा रस्ता, कडूस ते किवळे हा साडेपाच किलोमीटर रस्ता, किवळे ते आंबेठाण या रस्त्यामधील ९०० मीटर सिमेंट कॉंक्रिटीकरण, वडगाव घेणंद ते भोसे या रस्त्यावरील १२०० मीटर रस्ता, या कामांची निविदा प्रक्रिया पीएमआरडीएने राबविली आहे. परंतु निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा ३५ टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने त्या ठेकेदारांकडून खुलासे मागितले आहेत. रस्त्यांची कामे रखडल्यामुळे अपघात होत आहेत. या रस्त्यांची कामे का रखडली, हे सामान्यांना माहीत नसते. ही कामे तत्काळ करावी अशी मागणी नागरिक, कामगार, उद्योजकांनी केली आहे.
ठेकेदारांनी बिलो टेंडर भरल्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली आहेत. अगदी ३५ टक्के बिलो टेंडर भरलेली आहेत. त्यामुळे रस्त्याची कामे कशी, कोणत्या दर्जाची होणार हा सवाल निर्माण झाला आहे. हे ठेकेदार मुद्दाम हा प्रकार करतात असे चित्र आहे. या मार्गाची कामे नक्की का रखडली आहेत, हे नागरिकांना समजले पाहिजे. याबाबत पीएमआरडीएने चौकशी सुरू केली आहे. हे सर्व ठेकेदार खेड तालुक्यातील आहेत.
-दिलीप मोहिते, माजी आमदार
चाकण एमआयडीसीत ११ कोटींची कामे रखडली
एक ठेकेदार कंपनी न्यायालयात गेल्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची सुमारे ११ कोटींची कामे रखडली आहेत. यामध्ये शिंदेगाव ते जांबवडे, खराबवाडी, वाघजाईनगर, महिंद्रा कंपनीजवळील रस्त्याचा समावेश आहे. महिंद्रा कंपनीजवळील रस्ता न झाल्यामुळे महाळुंगे पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्यांची कामे रेंगाळल्यामुळेच हा अपघात झाला, असा आरोप मोहिते यांनी केला आहे.