
पुणे (Pune) : मांजरी (Manjari) येथील रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू होऊन वर्ष उलटून गेल्यानंतरही पुलाच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे.
त्यामुळे दोन्हीही बाजूने पुलाच्या तोंडावरच वारंवार अपघात सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. प्रशासनाच्या या बेपर्वाई विरोधात नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम विविध अडथळे पार करत व वारंवार संरचना बदलत काही प्रमाणात वाहतूकयोग्य झाल्याने गेल्या वर्षी नागरिकांनी उद्घाटनाची वाट न पाहता थेट पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूच्या तोंडावर सेवा रस्त्यासाठीचे संपादन रखडल्याने रस्ता निमुळता होऊन वारंवार अपघाती परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे येथे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन छोटे-मोठे अपघातही होत आहेत.
२०१७मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली मात्र प्रत्यक्ष काम २०१८ला सुरू झाले. पुलाची रुंदी, उंची, वळणे यामध्ये बदल झाले. त्यामुळे वारंवार पुलाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
उंची वाढल्याने पुलाची लांबीही वाढली. त्यासाठी पुन्हा नव्याने भूसंपादनाची गरज पडली. मात्र, आजही हे भूसंपादन होऊ शकलेले नाही. त्यामुळे सतरा मीटरवर उतरणारा पूल दहा मीटरवरच उतरविण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी तीव्र उतार निर्माण झाला आहे.
वाहने सुसाट वेगाने या उतारावरून उतरत आहेत. सोलापूर मार्गाकडून येणारी वाहने मांजरी ग्रीन सोसायटी मार्गे या ठिकाणी येऊन मिळतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
आम्हाला रेडी रेकनरच्या पाच किंवा सध्याच्या बाजारभावाच्या तीन पट दराने जागेला भाव मिळावा, अशी मागणी आहे. याबाबत चर्चा होऊन एक वर्ष होऊन गेले आहे. त्यानंतर आजपर्यंत कोणीही आमच्याशी चर्चा केलेली नाही. योग्य परतावा मिळाल्यास संपादनास आमची कोणतीही अडचण नाही.
- सचिन घावटे, बाधित शेतकरी
सेवा रस्त्यासाठी सुमारे २१ गुंठयांचे भूसंपादन रखडलेले आहे. त्यातील एक शेतकरी तयार झाला असून त्याचे खरेदीखतही झाले आहे. इतर शेतकऱ्यांशी संपादनाबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय दुसऱ्या बाजूने सक्तीच्या संपादनाची प्रक्रियाही सुरू आहे. त्यामुळे राहिलेल्या कामाची लवकरच पूर्तता होईल.
- नकुल रणसिंग, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग