
पिंपरी (Pimpri) : रेल्वे स्थानकांवरील डिस्प्ले बोर्डमुळे प्रवाशांना गाडी कोणत्या फलाटावर आहे, वेळ आदी माहिती मिळते. मात्र, पुणे विभागातील बहुतांश रेल्वे स्थानकावर कोच डिस्प्ले बोर्ड नसल्यामुळे प्रवाशांची दररोज धावपळ होत आहे. त्यामुळे अनेकवेळा गाडी पकडताना प्रवासी गंभीर जखमी होत आहेत.
पुणे रेल्वे विभागाच्या पुणे आणि लोणावळा स्थानकांवर दिवसाला २४० रेल्वे गाड्यांची ये-जा असते. तर पिंपरी, चिंचवड आणि तळेगाव या रेल्वे स्थानकांवर दररोज लोकल आणि सिंहगड एक्स्प्रेससह मोजक्याच एक्स्प्रेस गाड्या थांबतात. पुण्यासह लोणावळा आणि चिंचवड रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना गाडी कोणत्या फलाटावर लागणार, कोचची स्थिती कशी असणार, रेल्वेची वेळ आदी माहिती मिळावी, यासाठी डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच फलाटावर क्रमांक १ ते २२ कोचपर्यंत कोच डिस्प्ले लावलेले आहेत. मात्र, इतर स्थानकांवर डिस्प्ले बोर्ड लावलेले नाहीत. पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज लोकलच्या ४२ फेऱ्या होत आहेत. १२ डब्यांच्या लोकलमध्ये प्रथम श्रेणी, महिला, महिला प्रथम श्रेणी, विकलांग असे विविध आरक्षित डबे आहेत. पण, या डब्यांची स्थिती दर्शविणारे कोच डिस्प्ले बोर्ड नसल्यामुळे बऱ्याचवेळा प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. ज्येष्ठ नागरिक व महिलांची पळापळ होते. ब-याच वेळा रेल्वे सुरु झाल्यानंतर प्रवासी चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होत आहेत.
प्रवाशांना बसतोय भूर्दंड
कोच डिस्प्ले नसल्यामुळे बऱ्याच वेळा प्रवासी चुकून प्रथम श्रेणी, दिव्यांग डब्यात बसतात. द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास केल्यास २७० रुपये दंड अधिक प्रथम दर्जा तिकिटाची रक्कम इतका दंड भरावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
‘सिंहगड’च्या डब्यांची जागा बदलली
पुण्यातून दररोज सरकारी कर्मचारी, वकील, बँक कर्मचारी, व्यापारी, नागरिक पुणे-मुंबई प्रवास करतात. मुंबईला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.०५ वाजता सिंहगड एक्स्प्रेस सुटते. पिंपरी रेल्वे स्थानकावर कोच डिस्प्लेप्रमाणे सिंहगड एक्स्प्रेस थांबत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. नेहमीच या एक्स्प्रेसच्या डब्यांची जागा ऐनवेळी बदलल्यामुळे दररोज प्रवाशांची धावपळ होत आहे. त्यामुळे चालती गाडी पकडताना अपघाताचा धोका आहे.
या स्थानकांवर कोच डिस्प्ले नाहीत
दापोडी, कासारवाडी, आकुर्डी, भेगडेवाडी, घोरावाडी, वडगाव, कान्हे, मळवली
‘‘अमृत भारत स्टेशनअंतर्गत पुणे विभागातील चिंचवड, तळेगावसह विविध रेल्वे स्थानकांची कामे सुरु आहेत. या स्थानकांवर डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक