
पुणे (Pune) : मध्य पुण्यातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आता भुयारी मार्गाचा विचार केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावर उड्डाण पूल बांधणे शक्य नसल्याने प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग केला जाणार आहे. २२ मीटर खोल व चारपदरी हा मार्ग असणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी मेट्रोचा सल्ला घेणार आहे. सहा महिन्यांत याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. हा मार्ग झाल्यास मध्य भागातील मोठी कोंडी फुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावरून रोज सुमारे २० हजार वाहनांची ये-जा होते. शिवाय हा रस्ता अत्यंत वर्दळीचा व दाटिवाटीचा आहे. त्यामुळे एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होतो. शिवाय या रस्त्यावर उड्डाण पूल बांधणेदेखील शक्य नसल्याने भूमिगत रस्त्याच्या पर्यायावर विचार सुरू झाला आहे. आमदार हेमंत रासने यांनी हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मांडला. गुरुवारी या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन पुण्याच्या सार्वजनिक विभागाला याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा असणार रस्ता :
- शनिवारवाडा ते स्वारगेट व सारसबाग ते शनिवारवाडा असे दोन भूमिगत मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव.
- २२ मीटर अर्थात ७२ फूट जमिनीखालून हा मार्ग जाणार.
- चारपदरी हा रस्ता असणार
- भूमिगत मार्गावरून दुहेरी वाहतूक शक्य
- मेट्रोची मदत घेतली जाणार
- सध्याच्या दोन्ही मार्गांवर दैनंदिन २० हजार वाहनांची वाहतूक
- भूमिगत मार्ग झाल्यावर वाहतूक होणार सुरळीत
भूमिगत मार्गांसंदर्भात बैठक झाली. शनिवार वाडा ते स्वारगेट व सारसबाग ते शनिवार वाडा भूमिगत मार्गाचा डीपीआर सहा महिन्यांत तयार केले जाईल. याकामी आम्ही मेट्रोचीदेखील मदत घेणार आहोत. २२ मीटर खालून मार्ग तयार केला जाणार असल्याने इमारतींना कोणताही धोका नाही.
- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे