
पुणे (Pune): शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केबल टाकण्यात येणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात केवळ मध्यवर्ती पेठांमध्ये २८ किलोमीटरसाठी केबल टाकण्याची परवानगी दिली होती. मात्र, ठेकेदाराने पुढच्या खोदाईची परवानगी न घेता थेट संपूर्ण शहरात शेकडो किलोमीटरची खोदाई केल्याचे समोर आले आहे.
ठेकेदाराने परस्पर खोदाई केल्याने त्याला काम थांबविण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पथ विभागाने स्पष्ट केले आहे.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागातील काही गावे या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण १६०० किलोमीटरची खोदाई करण्यात येणार असून, त्यापैकी ५५० किलोमीटरचा भाग हा पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे.
पुण्यात गेल्या काही वर्षात ४०० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. या रस्त्यांचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) संपण्यापूर्वी हे या रस्त्यावर खोदाई होण्याची शक्यता आहे. त्यातच जानेवारीत पुण्यात जागतिक स्तरावरील सायकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग शहराच्या विविध विभागातून जात आहे. अशा रस्त्यावरही सीसीटीव्हीच्या केबलसाठी खोदाई प्रस्तावित आहे.
पथ विभागाने सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती पेठांमध्ये केवळ २८ किलोमीटरची परवानगी दिली होती. उर्वरित परवानगी नंतर दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र, उपनगरांमध्ये ठेकेदाराने रस्ते, पादचारी मार्गांची खोदाई सुरू केली. याबाबत पथ विभागाला पोलिसांनी व संबंधित ठेकेदारांनी अंधारात ठेवल्याचेही समोर आले आहे.
पथ विभागाला याबाबत विचारणा केली असता, ठेकेदाराला केवळ २८ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे. उपनगरांमध्ये खोदाईची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्यास नोटीस बजावून त्वरित काम थांबविण्याचे आदेश दिले जातील, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
खोदाई झाली, पण दुरुस्ती कधी?
गृह विभागाने काढलेल्या आदेशात ठेकेदाराकडून महापालिकेने खोदाई शुल्क घेऊ नये आणि रस्ते दुरुस्ती महापालिकेने करावी, असे नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराने केबल टाकून खड्डे बुजविल्यानंतर तेथे दुरुस्तीचे काम महापालिकेला करावे लागणार असल्याने ठेकेदार व पथ विभागात समन्वय असणे आवश्यक आहे.
पण ठेकेदाराकडून महापालिकेला विश्वासात न घेताच शेकडो किलोमीटरची खोदाई केल्याने सर्वच पादचारी मार्ग, रस्ते उकरलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या ठिकाणी आता पथ विभाग रस्ते दुरुस्त कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खोदाई थांबविण्याची मागणी
दिवाळीच्या निमित्ताने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. त्यातच शहरात सुरु केलेल्या खोदाईमुळे नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणेकरांची दिवाळी खड्ड्यात घालू नका. सण संपल्यानंतर शहरात खोदाई करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.