
मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबईत 70 किमी भुयारी मार्ग उभारण्याची चाचपणी सुरू केली आहे. भुयारी मार्ग उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एमएमआरडीए लवकरच सल्लागार नेमणार आहे.
दक्षिण मुंबईशी थेट बुलेट ट्रेन स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोरीवली यांना जोडणी देण्यासाठी, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यादरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी तब्बल 70 किमी लांबीचे भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.
भुयारी मार्गाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात कोस्टल रोडची थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाला जोडणी देण्यात येणार आहे. वांद्रे वरळी सी लिंक संपतो तिथून पुढे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारला जाईल. हा मार्ग पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे.
भुयारी मार्गाची जोडणी पूर्व उपनगरात चेंबूर आणि एमटीएचएलजवळ दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जाईल. तिसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबई थेट भुयारी मार्गानी बोरीवलीपर्यंत जोडली जाईल.
पहिला टप्पा -
वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक ते आंतरराष्ट्रीय विमानतळ - 16 किमी लांबी
दुसरा टप्पा -
पश्चिम द्रुतगती महामार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गाची जोडणी. यात आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हा मार्ग जाईल - 10 किमी
तिसरा टप्पा -
थेट दक्षिण मुंबई ते बोरीवली भुयारी मार्ग उभारला जाईल. हा भुयारी मार्ग ठाणे बोरीवली टनेलला जोडला जाईल - 44 किमी
एमएमआरडीएकडून भुयारी मार्गांची ही कामे सुरू -
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग - लांबी 11.85 किमी - प्रकल्प खर्च 18,838 कोटी
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग - लांबी 9.23 किमी - प्रकल्प खर्च 9,158 कोटी रुपये
मुंबई महापालिका -
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता भुयारी मार्ग -12.20 किमी लांबी