
पुणे (Pune) : आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासन दरवाढीसह अन्य महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्यात प्रवासाचे टप्पे कमी करणे, कर्मचाऱ्यांची भरती न करणे आदींचा समावेश आहे. तिकीट दरवाढीला विरोध होऊ शकतो, त्यामुळे ‘पीएमपी’ने गुप्तता पाळली आहे. (PMP Bus Ticket)
‘पीएमपी’च्या संचलनातील तोटा दरवर्षी वाढत आहे. संचलनातील तूट ७६६ कोटी झाल्याने प्रशासनाने तिकीट दरवाढीसंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अद्याप दरवाढीचा प्रस्ताव नसला, तरीही प्रशासन संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करणार आहे.
तिकीट दरवाढ झाल्यास प्रवासी व संघटनांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. असे असले, तरीही प्रशासन दरवाढीसाठी अनुकूल आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिकीट दरवाढ झालेली नाही. उत्पन्नवाढीसाठी दरवाढ करावी लागणार आहे.
कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेणार
सद्यःस्थितीत सुमारे आठ हजार ५०० कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर महिन्याला ४८ कोटींचा खर्च होतो. ही रक्कम जास्त असल्याने प्रशासनाने कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत नवीन बस दाखल होतील. यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक व वाहकांना घेणार आहेत. त्यामुळे वेतनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल.
प्रवासाचे टप्पे कमी होणार
१. टप्प्यांच्या आधारे तिकीट दर ठरतात
२. सध्याच्या तिकीट दरात एकूण ४२ टप्पे
३. दर दोन किलोमीटरचा एक टप्पा
४. प्रशासन आता टप्पे कमी करणार
५. ४२ ऐवजी ११ टप्पे करणार
६. प्रशासन म्हणते, प्रवाशांचा फायदा होईल
७. टप्पे कमी केल्याने तिकीट प्रणाली मेट्रोबरोबर जोडणे सोपे
तोटा कमी करण्यासाठी विविध पातळींवर काम सुरू आहे. तिकिटांच्या दराबाबतही पुनरावलोकन करत आहोत. प्रवासाचे टप्पे कमी करणे व कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामुळे उत्पन्न वाढविणे व खर्च कमी करणे साध्य होईल.
- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल