.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावर तीन स्टेशन प्रस्तावित आहेत. मात्र, आता नागरिकांच्या मागणीनुसार आणखी दोन वाढवून पाच स्टेशन केले जाणार आहेत. त्यामुळे खर्चात ६८३ कोटी रुपयांनी वाढ होणार आहे. यापैकी १५ टक्के खर्च महापालिकेला करावा लागण्याची शक्यता असून, हा वाढीव खर्च करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे.
स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोचे काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले. या ५.४६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज, असे तीन स्टेशन आहेत. त्यांच्यात अंतर जास्त असल्याने नागरिकांसाठी ते सोईचे नव्हते. त्यामुळे स्टेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती.
त्यानुसार बिबवेवाडी आणि बालाजीनगरला भूमिगत स्टेशन वाढविले आहे. त्यामुळे पद्मावती आणि कात्रज स्टेशनची जागाही बदलली आहे. नव्या प्रस्तावानुसार लोकशाही अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाजवळ बिबवेवाडी स्टेशन, शंकर महाराज मठाजवळ पद्मावती स्टेशन, राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर बालाजीनगर स्टेशन; तर कात्रज पीएमपी डेपोजवळ कात्रज स्टेशन असणार आहे.
जुन्या प्रस्तावानुसार या कामासाठी दोन हजार ९५४ कोटींचा खर्च येणार होता. त्यात आता ६८३ कोटींनी वाढ होऊन खर्च तीन हजार ६३७ कोटी रुपये होणार आहे.
जुन्या कायद्यानुसार केंद्र सरकार १० टक्के, राज्य सरकार १५ टक्के आणि पुणे महापालिका १५ टक्के, असा ४० टक्के निधी आणि उर्वरित ६० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभा करणार आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेला १५ टक्के रक्कम आणि भूसंपादनासाठी २४८.५२ कोटी रुपये इतका आर्थिक भार उचलावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता दोन स्टेशनमुळे मेट्रो मार्गाचा खर्च ६८३ कोटींनी वाढला आहे. त्याचा १५ टक्के खर्च पुणे महापालिकेला उचलावा लागेल, असे महामेट्रोने सांगितले आहे. त्यास महापालिकेने नकार दिला आहे.
दोन मेट्रो स्टेशन वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे. मात्र, हा वाढीव खर्च पुणे महापालिका करणार नाही, असे महामेट्रोला सांगितले आहे.
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग
या प्रकल्पासाठी कोणी किती खर्चाचा भार उचलायचा, हे ठरलेले आहे. महापालिकेने वाढीव खर्च द्यायचा की नाही? याचा निर्णय राज्य सरकार घेईल.
- हेमंत सोनवणे, महासंचालक, जनसंपर्क विभाग, महामेट्रो