
वारजे (Warje) : वारजे माळवाडी येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्यावर दुभाजक बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र या दुभाजकामुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. कारण रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी दुभाजक करणे योग्य नाही. भविष्यात हेच दुभाजक काढावे लागू शकतात. त्यामुळे महापालिकेने केलेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी या रस्त्यावर पदपथ निर्माण केलेला आहे. त्यामुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे. आता येथे दुभाजक बसविण्यात येत असल्याने मोठे वाहन या रस्त्याने जात असेल तर लहान वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नाही. दोन मोठी वाहने सोबत जाऊ न शकल्याने येथे आतापासूनच वाहतूक कोंडी होत आहे. मोठे वाहन रस्त्यातच बंद पडले तर पाठीमागील वाहनांचा खोळंबा होतो.
याच रस्त्यावर पुढे शाळा, रुग्णालय, एनडीए, नांदेड सिटी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कुडजे, बहुली अशी मोठी गावे आहेत. त्यांची संपूर्ण वाहतूक याच रस्त्याने होते. भविष्यात येथे रुग्णवाहिका अडकल्यास रुग्णाच्या जिवावर बेतू शकते, अशी परिस्थिती दुभाजकामुळे झालेली दिसून येते.
‘‘दुभाजकासाठी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन वर्षांपूर्वी मान्य केलेल्या दुभाजकाचे काम आता सुरू होत असेल तर हे योग्य नाही,’’ असे स्थानिक नागरिक राजीव पाटील यांनी सांगितले.
यासाठी महापालिकेने तब्बल ३० लाख रुपये मंजूर केलेले आहेत. दरम्यान हे दुभाजक बसवितानाही खालीवर बसविल्याने हे दुभाजक टिकणार नाहीत. पुढील काळात हे दुभाजक नागरिकांना अडथळा ठरू शकतात.
दुभाजकामुळे वाहतूक कोंडी तर सुटणार नाहीच याउलट कोंडी निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने फेरविचार करून जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळावा. भविष्यात हे दुभाजक वाहतुकीला अडथळा ठरून काढावे लागतील, यामध्ये शंकाच नाही.
- गणेश वांजळे, स्थानिक नागरिक
कामाचे टेंडर निघालेली आहे. काम मान्यता प्राप्त असल्याने ते करणे गरजेचे आहे. चढ - उतार पद्धतीने दुभाजक लागत असेल तर पाहणी करून समान पातळीत लावण्यात येतील.
- पियुष बोंडे, कनिष्ठ अभियंता, पुणे महापालिका