
पुणे (Pune) : शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सायकल योजना सुरू केली होती. त्यात खासगी कंपनीकडून भाड्याने या सायकल दिल्या जात होत्या. कालांतराने ही योजना गुंडाळण्यात आली. पण पुणे महापालिकेकडे माहिती अधिकारात याबाबत माहिती विचारल्यानंतर ही योजना कुठे सुरू आहे?, किती सायकल उपलब्ध आहेत याची ऑनलाइन माहिती बघा असे अजब उत्तर स्मार्टसिटीकडून देण्यात आले आहे. ही योजना अजून ऑनलाइन जिवंत ठेवल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
शहरात दुचाकी, चारचाकीची संख्या झपाट्याने वाढत असताना सायकल वापरण्यासाठीही पोषक वातावरण तयार झाले पाहिजे यासाठी काही खासगी कंपन्यांच्या मदतीने सायकल योजना सुरू केली. महापालिकेच्या सायकल योजनेअंतर्गत पुढील काही काळात शहरात एक लाख सायकल, ८ हजार सायकल स्थानके, ५३१ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग, ३१ किलोमीटरचा हरित मार्ग असे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एका ठिकाणावरून सायकल घेतल्यानंतर ती दुसऱ्या स्थानकावर सोडता येत होती, तसेच त्यासाठी शुल्क आकारले जात होते. पहिल्या टप्प्यात पुण्यात सुमारे तीन हजार सायकल दाखल झाल्या होत्या. या योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती पेठा, डेक्कन, कोथरूड, बाणेर, नगर रस्ता आदी भागात या सायकल सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. शहरात शेकडो सायकल उपलब्ध झाल्याने त्या पुणेकरांसाठी सोईस्कर ठरत होत्या. पण काही काळानंतर सायकल खराब होणे, त्यांची मोडतोड होणे, चोरीला जाणे असे अनेक प्रकार घडू लागले. त्यामुळे ही योजना २०१९च्या सुमारास बंद पडली. सध्या शहरात एकही सायकल अस्तित्वात नाही.
माहिती अधिकारात असे दिले उत्तर
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत परेश खांडके यांनी स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे स्मार्ट सायकल योजना राबविण्यात आली होती. ही योजना शहरात कुठे चालू आहे?, या अंतर्गत किती सायकल उपलब्ध आहेत, शहरात किती सायकल वितरित केल्या आहेत अशी माहिती मागितली होती. त्यावर स्मार्ट सिटीकडून उत्तर देण्यात आले असून त्यामध्ये ही माहिती पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ती आपण पाहून घ्यावी असे उत्तर देण्यात आले आहे.
सायकल योजनेसंदर्भात माहिती मागितली असता ती मला ऑनलाइन बघा असे उत्तर देण्यात आले. पण ही योजना बंद पडूनही स्मार्ट सिटीकडून अशा पद्धतीने देऊन ही योजना ऑनलाइन जिवंत ठेवली आहे.
- परेश खांडके, अर्जदार
अधिकारी अंधारात अन गोंधळात
या योजनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना या योजनेसंदर्भात माहिती नाही. त्यात अधिकारीही नवीन आहेत. महापालिकेच्या प्रकल्प तसेच पथ विभागाकडे चौकशी केली असता त्यांनाही या योजनेबाबत माहिती नाही. त्यामुळे अधिकारी अंधारात अन गोंधळात अशीच स्थिती दिसून येत आहे.