
मुंबई (Mumbai) : डोंबिवली मोठा गाव येथील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी चार पदरी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. रेल्वेने त्यासाठी १६८ कोटी मंजूर केले आहेत. या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाचे लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार असून त्यानंतर वर्षभरात हे काम मार्गी लागणार आहे.
डोंबिवली पश्चिम भागातील दिवा- वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठा गाव येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. येथून जाणाऱ्या- येणाऱ्या चाकरमान्याना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. ही समस्या नेहमीचीच असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार केला जाणार आहे.
रेल्वे फाटकऐवजी याठिकाणी प्रस्तावित असलेला उड्डाणपूल दोन लेन वाढवून हा रेल्वे उड्डाणपूल चार लेनचा करण्याची मागणी उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे २०१९ पासून पाठपुरावा सुरु होता. या कामासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही विशेष पाठपुरावा केल्याने हे काम लवकर मार्गी लागले आहे. आता चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामासाठी १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या खर्चातून पूलाच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादनही केले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेली कामे देखील केली जाणार आहेत.
रेल्वे उड्डाणपूल मोठा गाव माणकोली या खाडी पुलाला जोडला जाणार आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्टेशनच्या दिशेनेकडील प्रभाग कार्यालयाच्या आधी तसेच आनंदनगर याठिकाणी त्याला पोहोच रस्ता दिला जाणार आहे. रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण होताच, डोंबिवली माेठागाव येथील रेल्वे फाटक बंद होणार असून डोंबिवलीतून थेट मोठा गाव ठाकुर्ली माणकोली पूल गाठता येणार आहे.