
पुणे (Pune) : महापालिकेकडून शहरातील १५ ‘आदर्श रस्ते’ करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. आता आणखी १७ रस्त्यांची कामे करून संबंधित रस्तेदेखील ‘आदर्श’ करण्यास सुरुवात झाली आहे. एक ते दीड महिन्यांत संबंधित १७ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे. यापूर्वीच्या १५ आणि सध्याच्या १७ अशा ३२ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांची पावसाळ्यात होणारी तारांबळ कमी होण्याची चिन्हे आहेत.
पथविभागातर्फे शहरातील १५ रस्त्यांची निवड केली होती. या रस्त्यांवरील विद्युत केबल, जलवाहिन्या, मलवाहिन्यांची कामे पूर्ण करणे, रस्ता रुंदीकरण करून त्यावर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करणे, रस्त्यातील चेंबरच्या झाकणांभोवती दुरुस्ती करून ते समपातळीला आणणे, ‘इंडियन रोड कॉंग्रेस’च्या नियमांनुसार गतिरोधक, रम्बलर्स, रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, वाहतूक चिन्हांचे फलक, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पदपथ व्यवस्थित करणे या स्वरूपाची कामे करण्यात आली. संबंधित १५ आदर्श रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. महापालिकेने केलेल्या रस्त्यांच्या या कामामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष वाहतूक विभागाने काढला आहे.
दरम्यान, महापालिकेकडून आणखी १७ रस्ते आदर्श रस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील १७ रस्त्यांची निवड करून रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पथविभागाकडून भर दिला जात आहे.
‘हे’ आहेत १५ रस्ते...
नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, वेलस्ली रस्ता (मंगलदास रस्ता, संगमवाडी रस्ता), विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - बाजीराव रस्ता.
‘हे’ आहेत १७ रस्ते...
सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे मुंबई महामार्ग, लालबहादूर शास्त्री रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता, प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता.
शहरातील रस्ते अधिकाधिक चांगले व्हावेत, यादृष्टीने महापालिकेने पहिल्या टप्प्यांत १५ रस्त्यांची कामे सुरू केली होती. आता आणखी १७ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. दीड महिन्यांत या रस्त्यांची कामे पूर्ण होतील.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथविभाग, पुणे महापालिका