
पुणे (Pune) : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींची मोजणी गतीने मार्गी लावण्यासाठी खासगी एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबरच मोजणी व्हर्जन-२ मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. जेणेकरून भूसंपादनाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावणे शक्य होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांचा विमानतळाशी संबंध येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना ‘एमआयडीसी’ने नुकतीच काढली आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये जागेचे संयुक्त मोजणी करून घेणे, भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आदी विषयांवर चर्चा झाली होती. या बैठकीत भूसंपादनाचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूसंपादनासाठी अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे
काय करणार?
१) विमानतळासाठी सात गावांमधील दोन हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन
२) भूसंपादन सहा महिन्यांच्या मुदतीत करण्याचे नियोजन
३) भूसंपादनासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या आठवड्यात त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
४) मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादनासाठी जमिनीची संयुक्त मोजणी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे.
कोर्स आणि रोव्हर या आधुनिक सिस्टीममुळे जमिनींची मोजणी गतीने करणे शक्य होत आहे. परंतु, विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे क्षेत्र मोठे आहे. सहा महिन्यांत हे क्षेत्र संपादित करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे मोजणीचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेणार आहे. त्यासाठी ‘मोजणी व्हर्जन-२’मध्ये आवश्यक ते बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ते पूर्ण करून मोजणीचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने त्यावर कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
- डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त
अशी होणार भूसंपादन
९७२ हेक्टर
- पारगाव (सर्व्हे नंबर १५४२)
४५१ हेक्टर
- खानवडी (स. नं. ३८१)
३४१ हेक्टर
- कुंभारवळण (स. नं. ४२४)
३३० हेक्टर
- वनपुरी (स. नं. ३६२)
२४० हेक्टर
- उदाचीवाडी (स. नं. १९९)
२१४ हेक्टर
- एखतपूर (स. नं. १४५)
१२२ हेक्टर
- मुंजवडी (स. नं. २२१)