
पुणे (Pune) : शहरात महिला स्वच्छतागृहांची आधीच दुरवस्था आहे. त्यात आता विविध भागांत ठेवलेल्या ‘ती बस’ मोबाईल टॉयलेटची संख्याही रोडावली आहे. १३ पैकी केवळ तीन ‘ती बस’ सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
शहरात महिला स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. महापालिकेने उपलब्ध असलेल्या व पूर्वीच्या बस दुरुस्त करून मोबाईल टॉयलेट म्हणून वापरात आणण्याचे निश्चित केले आहे. मात्र, आता या उपक्रमासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मिळत नाही. त्यामुळे जाहिरात फलकांद्वारे उत्पन्न वाढवून मोबाईल टॉयलेट व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईल टॉयलेट चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत ‘ती बस’ सशुल्क होणार आहेत. या बाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम म्हणाले, ‘‘‘सीएसआर’ निधीच्या अभावामुळे मोबाईल टॉयलेट बससेवा सशुल्क करण्यात येणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.’’
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ असून, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था बरी होती. आता ती सेवादेखील सशुल्क करणार असल्याने नाहक भुर्दंड सहन करावा लागेल, हे महिलांचे दुर्दैव आहे.
- साक्षी मोरे, गृहिणी