Pimpri : चिंचवडगाव-थेरगावला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण पण ठेकेदाराने...

bridge
bridgeTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : चिंचवडगाव आणि थेरगाव यांना जोडण्यासाठी पवना नदीवर फुलपाखराच्या आकारात पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्याच्या जोड रस्त्याच्या कामास विलंब झाला आहे. मार्च अखेरपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा आदेश महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दिला आहे.

bridge
Mumbai : बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने दिली Good News; आता कोठूनही...

पवना नदीवर चिंचवडगाव आणि थेरगाव यांना जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव २०१७ मध्ये ठेवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत पुलाचे संथगतीने काम सुरू आहे. नदीवरील पुलाची उभारणी आणि दोन्ही बाजूस जोड रस्ते अशी स्वतंत्रपणे टेंडर प्रक्रिया राबवून पुलाचे काम सुरू झाले. मात्र, वेळेत पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्याची मुदत २६ जानेवारी रोजी संपली आहे. मात्र, अद्याप काम अपूर्ण आहे. त्यासाठीच्या नियोजित खर्चाने आधीची कोटींची उड्डाणे घेतली आहेत. आता त्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे पुलासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

bridge
Pune : झोपलेल्या महापालिका प्रशासनाला आली जाग! नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

असे होते नियोजन

- थेरगाव प्रसूनधाम सोसायटीजवळील १८ मीटर रस्त्यावर चिंचवडला जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव

- थेरगाव-चिंचवडगाव जोडणाऱ्या पुलाचा आकार फुलपाखरू अर्थात बटरफ्लाय प्रमाणे करण्याचे डिझाईन

- नदीचा प्रवाह सुरळीत वाहण्यासाठी पात्रात खांबांऐवजी दोन्ही तीरांवरील पायावर पुलाची उभारणी

- थेरगाव बाजूच्या रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे, मुरुमाचा भराव करणे, रस्त्याचे सबग्रेड व डांबरीकरण करणे

- चिंचवड बाजूच्या रस्त्याचे सबग्रेड व डांबरीकरण करून दिशादर्शक फलक लावणे

पुलाच्या कामाचा प्रवास

- महापालिकेने २०१७ मध्ये पूल उभारणीचे नियोजन

- ऑगस्ट २०२३ मध्ये पुलाच्या कामास प्रारंभ करण्याचा आदेश

- पुलाच्या कामाची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत

- नियोजित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने २६ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ

- नियोजित मुदत व मुदतवाढ कालावधी संपल्याने आणखी मुदतवाढ हवी

वस्तुस्थिती काय?

- पुलाचे नदीवरील बटरफ्लाय आकारातील सांगाडा (स्ट्रक्चर) पूर्ण

- पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण

- रस्त्यासाठी काँक्रिटच्या संरक्षक कठड्यांचे काम पूर्ण, भराव बाकी

- पूल व भराव यामध्ये काँक्रिट टाकून मजबुतीचे काम सुरू

पुलाचा फायदा...

- थेरगाव व चिंचवडला जोडणाऱ्या बिर्ला रुग्णालयाशेजारील पुलावरील ताण कमी होणार

- मोरया गोसावी मंदिराजवळील धनेश्वर पुलावरून अवजड वाहनांना बंदी असल्याने जवळचा मार्ग मिळणार

- थेरगाव लिंक रस्ता, हिंजवडी रस्ता आणि चिंचवड केशवनगर, काळेवाडी, पिंपरी लिंक रस्ता जोडणार

- चिंचवडमधील केशवनगर, पिंपरी लिंक रस्ता, काकडे पार्क, थेरगावच्या दत्तनगर भागाचा सुमारे दोन किलोमीटरचा वळसा वाचणार

- चापेकर चौक, चिंचवड पीएमपी बस थांबा भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार

असा असेल पूल

लांबी : १०७ मीटर

रुंदी : १८ मीटर

थेरगाव व चिंचवडला जोडण्यासाठी पवना नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या जोड रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यास विलंब केल्याने ठेकेदाराकडून दंड वसूल केला जात आहे. मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिली आहे.

- देवन्ना गट्टूवार, सहशहर अभियंता, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com