
पुणे (Pune) : नदी, नाला व लोहमार्गावरील पुलांसह उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पादचारी मार्गांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे शहरातील तब्बल ६७२ पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाणार आहे. नाल्यांवरील पुलांची संख्या ४३४ इतकी आहे. त्यासाठी टेंडर काढून सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शहरातून ४४ किलोमीटर लांब मुळा-मुठा नदी वाहते. या दोन्ही नद्यांमध्ये ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत नवीन पुलांची भर पडली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी, शहराचे दोन्ही भाग जोडण्यासाठी विकास आराखड्यातही अनेक पूल सुचविलेले आहेत.
महापालिकेतर्फे सध्या कर्वेनगर-सनसिटी या भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे; तर पुणे व पिंपरी-चिंचवडला जोडण्यासाठी औंध येथे नवीन पूल बांधला आहे. शहरात अनेक नाले वाहत आहेत, त्यावर पथ विभागातर्फे छोटे पूल (कलव्हर्ट) बांधले जातात. त्याचप्रमाणे मोठ्या चौकांमध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पादचारी भुयारी मार्ग, पादचारी पूलही बांधला जातो. शहरातून लोहमार्ग गेल्याने त्यावरही पूल बांधले जात आहेत.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
शहराचा विस्तार आणि वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुलांची संख्या वाढवून पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत. यासोबतच नवीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा विचारही करणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून गेल्याने अपघात घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर सर्व पुलांच्या सुरक्षेचे ऑडिट करावे, अशा सूचना महापालिकेला दिल्या आहेत.
आंबिल ओढ्यावर नवीन पूल
पुण्यात ढगफुटी झाल्यानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे या नाल्यावरील जवळपास सर्वच पुलांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेने टप्प्याटप्प्याने याठिकाणी नवीन पूल बांधले आहेत.
१५ कोटींची तरतूद
प्रकल्प विभागाने पुलांचे ऑडिट करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी स्ट्रक्चरल अभियंत्याकडून ६७२ पुलांची तपासणी करणार आहे. त्यात पूल सुरक्षित आहेत की नाही?, याबाबत अहवाल दिला जाईल. ज्या पुलांच्या मजबुतीकरणासाठी दुरुस्ती आवश्यक आहे, त्याच्या सूचना केल्या जातील. त्यानंतर महापालिका हे काम करेल. यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. आगामी अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम केला आहे. त्यानुसार महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.
- संदीप पाटील, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
पुलांचे प्रकार व संख्या
७० - मोठे पूल
१४ - उड्डाणपूल
१८ - लोहमार्गावरील पूल
३३ - भुयारी मार्ग
३३ - पादचारी भुयारी मार्गावरील पूल
१०८ - छोटे पूल
४३४ - नाल्यावरील पूल