MHADA : अखेर 'त्या' बिल्डरला हाकलले! जुहूतील 8 एकरचा भूखंड 20 वर्षांनंतर म्हाडाच्या ताब्यात
मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या मुंबई मंडळाने जुहूमध्ये अनधिकृत बांधकामे हटवत जवळपास आठ एकरचा भूखंड ताब्यात घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यावरील स्थगिती उठवल्यानंतर बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली.
हा भूखंड जुहूमधील मोक्याच्या ऋतंभरा महाविद्यालयासमोर आहे. स्थानिक भाजप आमदार अमित साटम यांनी म्हाडा आणि एसआरएकडे तक्रार केली होती. लोकनायक नगर, न्यू कापसवाडी आणि शिवाजी नगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरने १८,००० चौरस मीटरच्या भूखंडाचे काँक्रिटीकरण केले आहे आणि ते कार्यक्रमासाठी वापरत होते.
२०२२ मध्ये अतिक्रमण नसलेला भूखंड योजनेत समाविष्ट असल्याचे उघड झाल्यानंतर म्हाडाने जुहू येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द केले. ऑक्टोबर २०२२ मध्ये म्हाडाने आठ एकर (३२,९१३ चौरस मीटर) भूखंड कागदोपत्री ताब्यात घेतला.
अंधेरी (पश्चिम) येथील भाजप आमदार अमित साटम म्हणाले की, ऋतंभरा कॉलेजसमोरील सुमारे आठ एकरचा मोकळा भूखंड खोट्या झोपड्या आणि बनावट कागदपत्रे दाखवून एसआरए योजनेत बेकायदेशीरपणे जोडण्यात आला. गेल्या २० वर्षांपासून हा भूखंड बिल्डरच्या ताब्यात होता. २०२१ मध्ये आम्ही म्हाडा, जेव्हीपीडी फेडरेशन आणि आर्किटेक्ट पीके दास यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली.
गुगल इमेजेस मिळवून आणि परिशिष्ट २ मधील बनावट नोंदी उघड करून आम्ही कागदोपत्री हे सिद्ध केले की त्या जमिनीवर कधीही झोपडपट्ट्या नव्हत्या. त्यानंतर, म्हाडाने जमिनीचा कागदी ताबा घेतला. तथापि, प्रत्यक्ष ताबा घेण्यापूर्वीच, बिल्डरने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यावर स्थगिती मिळवली, असे साटम म्हणाले.
बुधवारी स्थगिती रद्द करण्यात आली आणि म्हाडाने गुरुवारी बेकायदेशीर बांधकामे पाडली. म्हाडाने आता भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे आणि तो बळकावण्यापासून रोखण्यासाठी त्या भूखंडावर बोर्डही लावले आहेत. रहिवासी आणि आर्किटेक्टसाठी हा सामूहिक आणि महत्त्वाचा विजय आहे. २० वर्षांनंतर बिल्डरकडून प्लॉट परत मिळवण्यासाठी आम्ही म्हाडासोबत लढलो आहोत, असे आमदार साटम यांनी सांगितले.