
पुणे (Pune) : परिवहन विभागाने (RTO) १ एप्रिल २०१९ च्या पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सेक्युरिटी नंबर प्लेट - HSRP) बसविणे अनिवार्य केले आहे. याचा गैरफायदा घेत काही विक्रेते बनावट पाटी तुलनेने कमी किमतीत वाहनांना बसवीत आहेत. अशा पाटीवर पिन क्रमांक नसतो. शिवाय त्याची नोंद ‘आरटीओ’च्या वाहन प्रणाली येथे नसते. त्यामुळे अशी पाटी हे बेकायदेशीर ठरते.
त्यामुळे पुणे ‘आरटीओ’ प्रशासनाने अशी पाटी असलेल्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार, तर संबंधित विक्रेत्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
परिवहन विभागाने राज्यातील सर्वच वाहनांना आता ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ अनिवार्य केल्याने वाहनधारक आता ही पाटी बसविण्यासाठी हालचाली करत आहेत. याचाच गैरफायदा घेत काही विक्रेते कमी किमतीत बनावट उच्च सुरक्षा पाटी असल्याचे भासवीत वाहनचालकांची फसवणूक करत आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या वाहनांसाठी पुण्यात ६९ केंद्र स्थापन केले असून, तिथे पाटी बदलण्याचे कामदेखील सुरू झाले आहे. मात्र, काही वाहनचालक या केंद्रांकडे नोंदणी न करता अधिकृत नसलेल्या विक्रेत्यांकडे पाटी बसवून घेत आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांना बनावट पाटी असली, तर संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार ‘आरटीओ’ प्रशासनाला आहेत. ज्या विक्रेत्याने बनावट पाटी बसविली असेल, अशांवरदेखील पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करू. वाहनधारकांनी अधिकृत केंद्रांवरूनच पाटी बसवावी. त्यामुळे फसवणूक होणार नाही.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे