

पुणे (Pune): पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. त्यासाठी वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग आणि पर्यटन यांचा एकात्मिक विचार करून दीर्घकालीन नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे PMRDA क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. PMRDAच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा आणि सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. भविष्यातील नागरी विस्ताराचा विचार करून या क्षेत्रातील पायाभूत सुविधांची आखणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
इनर रिंग रोडसह कनेक्टिव्हिटीला गती
पुणे इनर रिंग रोड, Comprehensive Mobility Plan (CMP) अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज यांसारख्या प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे शहर आणि PMRDA क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करण्यावर भर देण्यात आला.
मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आणि विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
हिंजवडी मेट्रो लाईन-३ला प्राधान्य
माण-हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नदी प्रदूषण नियंत्रणावर भर
PMRDA क्षेत्रातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून त्यांचे भविष्यातील संचालन आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्प आर्थिकदृष्ट्या शाश्वत असावेत, यावरही भर देण्यात आला.
१२ नवीन अग्निशमन केंद्रे प्रस्तावित
वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन PMRDA क्षेत्रातील अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना गती देऊन नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भविष्यातील पाणी गरजेसाठी नियोजन
PMRDA क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्यासोबतच उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था, नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांच्या भविष्यातील पाणी गरजांचा एकत्रित विचार करण्यावर भर देण्यात आला.
पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न ठेवता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान यांचा सर्वंकष विचार करून करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
Key Points
PMRDA क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश,
६७४ गावांचे आणि ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचे दीर्घकालीन नियोजन,
इनर रिंग रोड, मेट्रो लाईन-३, मल्टिमोडल हबसह कनेक्टिव्हिटीला प्राधान्य,
इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना गती,
कासार आंबोलीसह आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित.