नवी मुंबई मेट्रोचा विस्तार फास्टट्रॅकवर; पेंधर-पनवेल-नैना केनेक्टिव्हिटीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

पेंधर-तळोजा एमआयडीसी-खांदेश्वर मार्गिकेसाठी ५,५७५ कोटींचा सुधारित खर्च मंजूर; २.२ किमी इंटरलिंकसाठी ५७४ कोटी, सिडकोकडून नैना कॉरिडॉरसाठी ६९० कोटींची तरतूद
Navi Mumbai Metro
Navi Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर (टप्पा १) मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर सिडको आणि राज्य शासनाने मेट्रोच्या पुढील विस्ताराच्या आराखड्याला आणि निधीला गती दिली आहे. पेंधर येथून ही मेट्रो मार्गिका तळोजा एमआयडीसी, कळंबोली, खांदेश्वर, पनवेल आणि सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘नैना’ क्षेत्रापर्यंत जोडली जाणार आहे. त्यासाठी एमएमआरसीएलने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

Navi Mumbai Metro
Navi Mumbai Metro: नवी मुंबई विमानतळाला मेट्रो कनेक्टिव्हिटी; 17 किमीच्या दोन मार्गिका

पेंधर-तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर या सुमारे ८.१५ किमी ते १०.३ किमीच्या मार्गिका दोनसाठी ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाच्या निधीला राज्य सरकारने याआधीच मंजुरी दिली आहे. तर पेंधर ते तळोजा इंटरलिंक टप्पा तीनमध्ये पेंधर स्थानक ते तळोजा एमआयडीसी जोडणाऱ्या २.२ किमीच्या टप्प्यासाठी सुमारे ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सिडकोने नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि मेट्रोच्या नवीन विस्तारासाठी कळंबोली-चिखले-कोन कॉरिडॉरसाठी आपल्या वार्षिक अर्थसंकल्पातून ६९० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची स्वतंत्र तरतूद केली आहे.

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेनंतर आता मेट्रोचा पुढील विस्तार वेगाने करण्याची तयारी सुरू झाली आहे. या विस्तारामुळे नवी मुंबईच्या उपनगरीय आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

पेंधर येथून ही मार्गिका तळोजा एमआयडीसी, कळंबोली आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकापर्यंत वाढवली जाणार आहे. पुढे खांदेश्वर येथून मेट्रो मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे, तर दुसरी शाखा पनवेल आणि नैना क्षेत्रातील वेगाने विकसित होणाऱ्या गावांपर्यंत विस्तारित केली जाणार आहे.

Navi Mumbai Metro
Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रोचा मार्ग बदलणार? काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प आणि व्यापारी संकुले उभी राहत आहेत. या भागात मजबूत सार्वजनिक वाहतूक यंत्रणेची गरज असताना पेंधर-पनवेलमार्गे मेट्रो नैना क्षेत्रात पोहोचल्याने या परिसरातील नागरिकांना बेलापूर, वाशी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट व पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य शासन आणि सिडकोने या टप्प्यासाठी आवश्यक मंजुरी आणि निधी नियोजनाचे काम वेगाने सुरू केले आहे.

या विस्तारित मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नवी मुंबई आणि पनवेल परिसर एकाच मेट्रो जाळ्याने जोडला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्ग आणि तळोजा एमआयडीसी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. खारघर, तळोजा आणि पनवेल भागातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी थेट मेट्रोची सुविधा मिळणार आहे.

मेट्रो विस्तारामुळे तळोजा, पनवेल आणि नैना परिसरातील गृहनिर्माण क्षेत्राला मागणी वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता आहे. खांदेश्वर आणि पनवेल स्थानकांशी मेट्रो जोडल्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा ताण विभागला जाण्याची अपेक्षा आहे.

Navi Mumbai Metro
मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; ₹17,725 कोटींच्या Metro-13ला हिरवा कंदील

तळोजा एमआयडीसी आणि पेंधर या भागात मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यामुळे उद्योजक, कामगार आणि स्थानिक रहिवाशांना खांदेश्वर आणि बेलापूर स्थानकांशी वेगवान जोडणी मिळणार आहे. कामोठे, कळंबोली आणि खांदेश्वर तसेच सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून रहिवाशांना सुरक्षित आणि एसी मेट्रो प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खांदेश्वर स्थानकावरून थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. नैना क्षेत्रातील चिखले, कोन आणि पनवेल ग्रामीण भागातील वेगाने विकसित होणाऱ्या नवीन गृहप्रकल्पांना नवी मुंबई आणि मुंबई शहराशी जोडण्यास मदत होणार आहे.

नैना क्षेत्र आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नवीन मार्गांसाठी सिडकोने सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार केला असून तांत्रिक सल्लागारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील १.१ किमी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर आता मार्गिका दोन आणि तीनच्या प्रत्यक्ष सिव्हिल कामांसाठीच्या टेंडर आणि जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे.

Navi Mumbai Metro
260 कोटींचा पूल पाडण्याची वेळ; मेट्रो 7Aचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर

Key Points

  • बेलापूर-पेंधरनंतर नवी मुंबई मेट्रोचा पुढील विस्तार पेंधर-पनवेल-नैना क्षेत्रापर्यंत होणार

  • पेंधर-तळोजा एमआयडीसी-खांदेश्वर मार्गिका दोनसाठी ५,५७५ कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी

  • पेंधर-तळोजा इंटरलिंकच्या २.२ किमी टप्प्यासाठी सुमारे ५७४ कोटींचा खर्च अपेक्षित

  • कळंबोली-चिखले-कोन कॉरिडॉरसाठी सिडकोची ६९० कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद

  • खांदेश्वरमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो जोडण्याचे नियोजन

  • मेट्रोची दुसरी शाखा पनवेल आणि नैना क्षेत्रातील गावांपर्यंत विस्तारित होणार

  • तळोजा, पनवेल आणि नैना भागातील सार्वजनिक वाहतुकीला फायदा होण्याची अपेक्षा

  • सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होण्याची शक्यता

  • नैना क्षेत्र आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा

  • मार्गिका दोन आणि तीनच्या सिव्हिल कामांसाठी टेंडर व जमीन अधिग्रहण प्रक्रियेला गती

Tendernama
www.tendernama.com