
पुणे (Pune): पुणे महापालिका (PMC) आयुक्तांच्या बंगल्यातून एअर कंडिशनर, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही असे लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले आहे. त्यामुळे आता २० लाख रुपयांच्या नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू झाली आहे.
कडक सुरक्षा असलेल्या आयुक्त बंगल्यातून या वस्तू गेल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या प्रकरणावरून अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
मॉडेल कॉलनी येथील सुमारे अर्ध्या एकरावर पुणे महापालिका आयुक्तांना सुसज्ज असा बंगला आहे. त्याच्यासमोर छानसे उद्यान आहे. महापालिका आयुक्तांच्या घराच्या आवारात सीसीटीव्ही आहेतच, पण त्या ठिकाणी महापालिकेची २४ तास सुरक्षाव्यवस्था आहे. त्यामुळे या बंगल्यात पूर्वपरवानगी असल्याशिवाय कोणीही ये-जा करू शकत नाही.
या बंगल्यात यापूर्वी डॉ. राजेंद्र भोसले हे राहात होते. आता नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम हे राहायला आले आहेत. आयुक्तपदावरून डॉ. भोसले सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी घराचा ताबा सोडला. त्यानंतर महापालिकेच्या भवन, विद्युत, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली. घरातील चार एसी, झुंबर, जुन्या काळातील पितळी दिवे, ४५ आणि ६५ सेंटिमीटरचे दोन एलईडी टिव्ही, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, किचन टॉप, ॲक्वागार्ड असे साहित्य आतमध्ये नसल्याचे समोर आले.
महापालिकेतर्फे आयुक्तांचा बंगला हा सर्व सोईंनीयुक्त असा सुसज्ज ठेवला जातो. पण यातील अनेक वस्तू गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. मात्र, हा प्रकार समोर येऊ नये म्हणून अतिशय गुप्तता पाळण्यात आली.
नवलकिशोर राम हे याठिकाणी राहण्यासाठी येणार असल्याने त्यांना बंगला पूर्ववत करून देणे आवश्यक आहे, त्यामुळे विद्युत विभागाकडून एसी, टीव्ही, ॲक्वागार्ड यासह अन्य महत्त्वाच्या वस्तू घेण्यात आल्या, तर अन्य वस्तूंसाठी टेंडर काढली आहे. हे सर्व साहित्य सुमारे २० लाख रुपये इतके किमतीचे आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
आयुक्त बंगल्याची जबाबदारी कोणाची?
पुणे महापालिका आयुक्तांचा बंगला कोणाच्या ताब्यात असतो, असा प्रश्न घटनेमुळे निर्माण झाला आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे या बंगल्याचा ताबा आहे असे सांगितले जात होते, पण या विभागाच्या उपायुक्तांनी ‘आम्ही बंगला भवन विभागाकडे हस्तांतरित केला आहे, त्यामुळे आमचा संबंध नाही’ असे सांगितले. भवन विभागाचे म्हणणे ‘ही मालमत्ता आहे, त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडेच हे बंगला असतो’, तर या ठिकाणी सुरक्षा विभागाचे लोक २४ तास असतात, त्यामुळे त्यांच्याकडेही हा बंगला आहे असे सांगण्यात आले.
त्यामुळे आयुक्तांच्या बंगल्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? यावरून सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
महापौर बंगल्यातही झाली होती चोरी
घोले रस्त्यावर महापौर बंगला आहे. सुमारे १० वर्षापूर्वी या बंगल्यातून एलईडी टीव्ही चोरीला गेला होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोर अद्यापही सापडलेला नाही, पण आयुक्त बंगल्यातून लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्या असल्या तरी अजून तक्रार देण्यात आली नाही.