MSRTC: ‘एसटी’च्या निर्णयाला सरकारचा हिरवा कंदील

MSRTC
MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

MSRTC
'समृद्धी'ला जोडला जाणारा 104 किमीचा नवा एक्स्प्रेस-वे कोठून सुरू होणार?

या कालावधी वाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभणार आहे. बसस्थानके, बस आगार, तसेच महानगरांसह, अन्य नागरी भागात प्रवाशांसह, विविध घटकांना चांगल्या सुविधा पुरविता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर उपयोग करण्याकरिता यापुर्वी २००१ मध्ये भाडेकराराचा कालावधी ३० वर्षे होता. त्यानुसार महामंडळाने २०१६ पर्यंत राज्यात असे ४५ प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धोरणानुसार राबविले.

याच धोरणानुसार राज्यात १३ ठिकाणी आधुनिक बसतळ उभारणे प्रस्तावित होते. पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ पनवेल व छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पांना प्रतिसाद लाभला. त्यामुळे २०२४ मध्ये नवे धोरण आखण्यात आले. या धोरणात भाडेपट्टा कराराचा कालावधी ३० वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आला.

MSRTC
Devenra Fadnavis: आगामी 5 वर्षांत बदलणार महाराष्ट्राची ओळख! काय आहे CM फडणवीसांचा प्लॅन?

हे धोरण तयार करतानाच विविध महामंडळ आणि प्राधिकरणांकडील भाडेपट्टा करारांचा कालावधी ९९ वर्षे असल्याचे तज्ज्ञांच्या समितीने लक्षात आणून दिले होते. हा कालावधी वाढविल्यास प्रकल्पांची व्यवहार्यता वाढते, तसेच महामंडळास अपेक्षित आगाऊ प्रिमीयम म्हणून दीड ते दोनपट अधिक मिळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाने आपल्याकडील विविध जागांवर सार्वजनिक-खासगी सहभागाअंतर्गत (पीपीपी) प्रकल्प राबविण्यासाठी भाडेकराराचा कालावधी ६० वर्षाऐंवजी ९९ वर्ष करण्यास मान्यता दिली.

त्यानुसार महामंडळाच्या जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर व्यवहार्य व्हावा यासाठी भाडेपट्टा कराराचा कालावधी ६० वर्षांऐवजी आता ४९ वर्ष अधिक ४९ वर्षे असे एकूण ९८ वर्षे करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यात कराराचे नुतनीकरण हे प्रचलित धोरण, व नियमांनुसार करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com