
पुणे (Pune) : शहरातील रस्ते सुधारणा व वाहतुकीची समस्या, यावर लक्ष केंद्रित करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद ठेवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी इतर सरकारी कार्यालयांचीही मदत घ्यावी, असेही पवार यांनी महापालिका प्रशासनास सांगितले. समाविष्ट गावांच्या मिळकत कर आकारणीसंदर्भात जानेवारी महिन्यात मुंबईत बैठक घेण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी आघारकर रस्त्यावरील सारथी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते. या बैठकीबाबतची माहिती देताना पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रस्ते व वाहतूक कोंडी या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्रो, पीएमपी, वाहतूक पोलिस या सर्व घटकांना एकत्र आणून आराखडा तयार करावा. रस्त्यांवरील अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरणाची कामे मार्गी लावण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर रस्त्यांची कामे करताना ठिगळांच्या स्वरूपात नव्हे, तर अखंड स्वरूपात करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.’’
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावातील मिळकत कर वसुलीस राज्य सरकारने स्थगिती दिलेली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमध्ये नागरी सुविधा पुरविताना अडचण येत आहे. हा विषय पवार यांच्यासमोर मांडला. त्यावेळी त्यांनी जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. या बैठकीतून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
जीएसटीचा वाटा महापालिकेस मिळावा
समाविष्ट झालेल्या गावातील वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) उत्पन्नाचा वाटा महापालिका प्रशासनास मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे महापालिका प्रशासनाने केली. महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर लोकसंख्येचा विचार करता, या गावातून गोळा केला जाणाऱ्या जीएसटीमधील वाटा महापालिकेला मिळत नाही. हा वाटा महापालिकेला मिळण्याची गरज आहे, त्यावर बैठकीत चर्चा झाली, तसेच समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा विषय या बैठकीत मांडल्याचे पृथ्वीराज पी. बी. यांनी सांगितले.