
पुणे (Pune) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी ते खडकी रेल्वे स्थानकापर्यंत हलक्या वाहनांसाठी शुक्रवारपासून रस्ता खुला झाला. मात्र खडकी रेल्वे स्थानक ते दारूगोळा कारखाना, संविधान चौकापर्यंत रस्त्यात येणारे मेट्रोचे खांब, पथदिवे, रिफ्लेक्टरचा अभाव, अशा विविध कारणांमुळे वाहतुकीला धोका कायम आहे. याबरोबरच मेट्रोचे खांब मध्यभागी येत असल्याने रस्ता अरुंद होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.
बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र या तीन किलोमीटरच्या अंतरात मेट्रो प्रकल्प, रस्ता रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू होते. त्यामुळे बोपोडी चौक ते संविधान चौक या रस्त्यावरील वाहतूक एल्फिस्टन रस्त्यावरून खडकी बाजारमार्गे संविधान चौकात वळविण्यात आली होती. मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होत आल्याने खडकीतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बोपोडी चौक ते संविधान चौक अशी वाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली.
पुन्हा अडचणी, पुन्हा ‘अंतर्गत’ वळसा !
बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्थानक या एक किलोमीटरच्या रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र जयहिंद चित्रपटगृह ते सीएफव्हीएडी मैदानापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. मेट्रोचा खांब व दुभाजक यातून केवळ एक मोटार जाऊ शकेल, इतकाच रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यावर पथदिवे नाहीत, मेट्रोच्या खांबांना रिफ्लेक्टर नाहीत, त्यामुळे अपघात होऊ शकतात. सीएफव्हीएडी मैदानापासून दारूगोळा कारखाना रुग्णालय, ऑल सेंट स्कूल, संविधान चौक या खडकी कॅन्टोन्मेंटच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बोपोडी चौकापासून ते सीएफव्हीडीएपर्यंतचा रस्ता खुला झाला आहे, मात्र पुन्हा अर्धा किलोमीटर वळसा घालून वाहनचालकांना संविधान चौकात यावे लागते.
दोन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण
खडकी कॅन्टोन्मेंटच्या ९९ वर्षे भाडेकराराने दिलेल्या जयहिंद चित्रपटगृहासह व अन्य मालमत्तांची तांत्रिक कामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे जयहिंद चित्रपटगृह ते संविधान चौक यादरम्यान महापालिकेच्या पथ विभागाला रस्त्याचे काम करता आलेले नाही. भाडेकरारासंबंधीचा प्रश्न मिटल्यानंतर दोन महिन्यांतच संबंधित रस्त्याचे काम होणार आहे. मेट्रोचे काही खांब अडथळा ठरत असल्याचे दिसत असले तरीही पूर्ण रस्त्याचे काम झाल्यानंतर ते खांब रस्त्याच्या मध्यभागी येतील, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या हलक्या वाहनांसाठी हा रस्ता खुला केला आहे. अपघात होऊ नयेत, यासाठी तेथील कामे त्वरित पूर्ण करू. तांत्रिक अडचणी संपल्यानंतर दोन महिन्यांत रस्त्याचे उर्वरित काम केले जाईल.
- दिनकर गोंजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका