
पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) पावसाळी गटारांची स्वच्छता केल्याचा दावा केला; मात्र, शनिवारी (ता. २) पहाटे मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शहर जलमय झाले. हडपसर, नगर रस्ता, कोंढवा, स्वारगेट, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, येरवडा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.
महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्रपणे टेंडर काढून पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असली तरी ठेकेदारांकडून पावसाळ्यातही गटार आणि चेंबर स्वच्छ करून घेतले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात ही कामे व्यवस्थित न झाल्याने मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने शहर जलमय झाले.
या भागात तुंबले पाणी
जेधे चौक-स्वारगेट, गुंजन टॉकीज चौक, नॉर्थ मेन रस्ता, रवीदर्शन चौक - लुल्लानगर, मगरपट्टा, भाग्योदयनगर, संविधान चौक- घोरपडी, हडपसर औद्योगिक वसाहत, सिंहगड रस्त्यावरील इनामदार चौक, पु. ल. देशपांडे उद्यान, दत्तवाडी चौक, डीपी रस्ता - म्हात्रे पूल, राजाराम पूल या भागात पाणी तुंबले होते. बिबवेवाडीचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.
महापालिकेकडे २२ तक्रारी
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे २२ तक्रारी आल्या. यातील बहुतांश तक्रारी या पाणी तुंबल्याच्या होत्या. बिबवेवाडी येथे व्हीआयटी महाविद्यालयाजवळ भिंत पडल्याची तक्रार होती. महापालिकेकडे तक्रारी आल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, मलःनिसारण विभागाचे उपअभियंता, बिगारी यांच्यामार्फत पाणी निचरा करण्यासाठी काम सुरू केले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने रस्त्यावरील पाणी कमी झाले.
चौकांमध्ये गुडघाभर पाणी
बिबवेवाडीतील महेश सोसायटी चौकाला नदीचे स्वरूप आले होते, रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, अनेकांची वाहने बंद पडली. विमाननगर परिसरातील चौकाचौकांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते, त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. पादचाऱ्यांचेही हाल झाल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.
असमान रस्त्यांमुळे फटका
पथ विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविले असल्याचा दावा केला असला ही कामे व्यवस्थित झालेली नाहीत. असमान पातळीतील रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळी गटारांच्या झाकणातील कचरा न काढल्याने पाणी गटारात न जाता रस्त्यावर आले. राजाराम पुलावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.
पाणी तुंबल्याच्या तक्रारी ज्या भागातून आल्या, तेथे क्षेत्रीय कार्यालयाचे पथक पाठवून पाण्याचा निचरा करून दिला. हडपसर, मुंढवा, कोंढवा, येवलेवाडी, कोरेगाव पार्क, नगर रस्ता, स्वारगेट भागातून जास्त तक्रारी आल्या होत्या. बिबवेवाडी येथे भिंत पडल्याची एक तक्रार होती.
- गणेश सोनूने, सहायक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका