
सोलापूर (Solapur) : आध्यात्मिक पर्यटनात सोलापूर जिल्ह्याला असलेली मोठी संधी साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातून जिल्ह्यातील पाच मंदिरांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून कोणती कामे करावीत, यासाठीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तयार केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा आराखडा १५ दिवसांत प्राप्त होणार आहे. या आराखड्यानंतर या कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. टेंडर प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी, अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. या शिवाय कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र-प्रदेश या राज्यातील भाविक शिर्डीला जाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातूनच जातात.
या जिल्ह्यातील आध्यात्मिक पर्यटनाचा विकास झाल्यास या जिल्ह्यात बाहेरचे भाविक थांबतील. सोलापुरला भविष्यात मोठा रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आम्ही पर्यटनाकडे पहात आहोत.
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर विकास व इतर कामांसाठी ३६८ कोटी रुपयांचा आराखडा राज्याच्या शिखर समितीने मंजूर केला आहे. बार्शीच्या २८६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला व कुडल संगमच्या (ता. दक्षिण सोलापूर) १७३ कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.
बार्शी आणि कुडल संगमचा आराखडा उच्चस्तरीय समिती व शिखर समितीने मंजूर करावा यासाठी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाला जिल्हा प्रशासनाने मोठे आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटनाशी निगडित मोठी रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.
या पाच मंदिरांचा समावेश
- सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर
- सिद्धेश्वर मंदिर, माचणूर, ता. मंगळवेढा
- नागनाथ मंदिर, वडवळ, ता. मोहोळ
- कमलादेवी मंदिर, करमाळा
- शिवसृष्टी व शिव पार्वती मंदिर, अकलूज, ता. माळशिरस
आध्यात्मिक पर्यटनामध्ये सोलापूर जिल्ह्याला खूप मोठी संधी आहे. या जिल्ह्यात आलेल्या भाविकांना पर्यटनाच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात, पर्यटनातून मोठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उजनी जल पर्यटनासोबतच आता या पाच प्रमुख मंदिरांसाठी तरतूद केली आहे. त्यातून आध्यात्मिक पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण होतील.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर