
सातारा (Satara) : राज्य सरकारकडे कोरोना काळापासून थकीत असलेली देयके तातडीने अदा करावीत या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (Builders' Association of India - BAI) वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा शाखेच्यावतीने बांधकाम भवन येथे धरणे धरण्यात आले.
यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन देशमुख, सातारा सेंटरचे अध्यक्ष अनिल दातीर, सेक्रेटरी कौस्तुभ मोरे, इतर पदाधिकारी, सदस्य व सरकारी ठेकेदार उपस्थित होते.
सचिन देशमुख म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या अनेक समस्या आहेत. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे गेले दोन वर्षांपासून विभागाकडे असणारी देयके अपुऱ्या निधीच्या अभावी प्रलंबित आहेत. काही ठिकाणी ३१ मार्च अखेर फक्त ५ ते १० टक्के निधी उपलब्ध झाला व तेवढ्याच रकमेची बिले काढली गेली. दुसरा मुद्दा म्हणजे आधीची देयके तशीच प्रलंबित ठेवून नवीन आर्थिक निधीची कोणतीही तरतूद न करता टेंडर काढण्याचा प्रकार सुरू आहे. हा ठेकेदारांवर होणारा अन्याय आहे.
सातारा सेंटरचे अध्यक्ष अनिल दातीर यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून थकीत बील मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु थकीत बिले अदा करण्याबाबत संबंधितांनी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे नाईलाजास्तव संपूर्ण राज्यभर बिल्डस असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व थकीत बिले त्वरीत अदा करण्याचे निवेदन अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना देण्यात आले.