'हे' ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचे सर्वांत मोठे गिफ्ट ठरणार का?

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेकांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ९०० खाटांच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

Eknath Shinde
नितीन गडकरींचा नागपुरातील 'हा' महत्त्वाचा प्रकल्प अडचणीत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन व रिमोटव्दारे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला या कामाचे टेंडर मिळाले आहे. ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५२७ कोटीचा खर्च येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, या रुग्णालयाचे नुतनीकरण करणे, अत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. कोरोना काळात या रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या रुग्णालयामुळे कोरोना महामारीत लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.

सर्व अडचणींवर मात करून अत्याधुनिक सेवासुविधा असलेले रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विहित मुदतीच्या आत दर्जेदार इमारत तयार करून देण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.

Eknath Shinde
धक्कादायक! सरकारची आर्थिक स्थिती खालावली? 2200 कोटीचे धनादेश रोखले

पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आजचा दिवस सूवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे, असे सांगून सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्यानंतर जनतेने रुग्णालयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ९०० खाटांच्या अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण होण्याआधीच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यास रुग्णालय संपूर्ण ताकदीने सुरू होईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबी आतापासूनच पूर्ण कराव्या, अशा सूचना पाटील यांनी यावेळी केल्या.

सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, 18 महिन्यांत पूर्ण होणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाचे मी स्वत: माझ्या स्तरावर मॉनिटरिंग करणार आहे. या बांधकामाचा प्रत्येक महिन्याचा आढावा घेणार आहे. हे रुग्णालय भारतात प्रथम क्रमांकचे रुग्णालय होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी आणि सर्दी खोकल्या सारख्या आजारांचा लगेच उपचार करावा, अशा सूचनाही डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी केल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांनी प्रास्तविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील चित्रफितीव्दारे नवीन इमारतीची माहिती देण्यात आली.

यावेळी कडक उन्हात राहून वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आभार मानले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, रमेश पाटील, संजय केळकर, रविंद्र फाटक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, सा.बां. प्रा. विभाग कोकणचे मुख्य अभियंता शरद राजभोज, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde
Sambhajinagar : पालकमंत्री भुमरेंच्या घरासमोर शिंदे सरकार पावले

कशी असेल नवीन इमारत?
नवीन बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ ६ लाख ८१ हजार ३९७.४० स्वे. फूट आहे. मुख्य इमारत (Block-A) यामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय बेसमेंट २ + बेसमेंट १ + तळ मजला + १० मजले एअर रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यात एक परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारत आहे. ही इमारत १० मजली असून यामध्ये बैठक कक्ष, ३०० प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण वर्ग, तळमजल्यावर भोजनकक्ष इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर वसतिगृहाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळ, तळ मजला + ६ मजले क्षमतेचा असून इमारतीच्या छतावर सौरउर्जातंत्र बसविण्यात येणार आहे.

रुग्णालयाची नवीन इमारत (Block-A) व नर्सिंग प्रशिक्षण केंद्र ( Block-B) या दोन्ही इमारतींना सातव्या मजल्यावर पूलाव्दारे जोडण्यात येत आहेत. इमारतीमध्ये १४ उद्वाहन, ११ आधुनिक आय.सी.यू. (एकूण ११७ खाटा), १५ ओ.टी., इ. सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात सौर उर्जेद्वारे निर्माण केलेल्या वीजेचा वापर करण्यात येणार आहे. २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी विभागामध्ये कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, ऑनकॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या प्रमाणे अत्याधुनिक साधनसामुग्रीसह सुविधा उपलब्ध होणार आहेत. ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेरियाटीक वॉर्ड, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड, इएनटीसह, ऑर्थोपेडीक वॉर्ड, ट्रामा केअर युनिट, इन्टेन्सिव्ह केअर युनिट, आयसोलेशन वॉर्ड, बर्न वॉर्ड, आय वॉर्ड व शस्त्रक्रियागृह, टीबी आणि चेस्ट वॉर्ड, एसएनसीयू वॉर्ड, एनआरसी वॉर्ड, सायकॅट्रिक वॉर्ड, प्रिंझनर वॉर्ड, हिमॅटॉलॉजी वॉर्ड याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

२०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्व/प्रसूतीपश्चात/प्रसूती कक्ष तसेच इक्लॅम्पशिया कक्ष, तसेच प्रसूती वॉर्ड व बालरुग्ण वॉर्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा रुग्णालयात ब्रेन, हार्ट, किडनी सर्जरी, अत्याधुनिक डायलिसीस, कार्डियाक न्युक्लिअर मेडिसीन, रेडिओथेरपी, केमोथेरपी, अत्याधुनीक प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. 

मातामृत्यू दर कमी करण्यासाठी आधुनिक आय.सी.यू. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यू. उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अद्ययावत एमआरआय, सी.टी. स्कॅन, एक्स-रे, लॅब सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पीएसए प्लांट, लिक्वीड ऑक्सिजन प्लांट, जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सेंट्रल लाईन इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा वापर भविष्यात करण्यात येईल. ठाणे जिल्हा रुग्णालय हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय असून लगतचे पालघर व रायगड जिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. याठिकाणी सुपरस्पेशालीटी रुग्णालय झाल्यास ठाणे, पालघर, रायगड येथील गोर, गरीब, गरजू, आदिवासी रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई येथे स्थलांतरीत करावे लागणार नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com