Sambhajinagar : पालकमंत्री भुमरेंच्या घरासमोर शिंदे सरकार पावले

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रोजगार हमी योजना व जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे राहत असलेल्या गारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक ९७ येथे अगदी त्यांच्या निवासस्थानासमोरच खुल्या जागेचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे. सर्व बाजुने दहा ते पंधरा फुटाच्या आरसीसी संरक्षक भिंती, त्यावर लोखंडी ग्रील, आतल्या बाजुला भव्य सांस्कृतिक मंच आणि पॅव्हरब्लाॅक, खुल्या जागेत विविध प्रजातीची झाडेफुले आणि खेळण्या. या कामावर साधारणतः २० ते २५ लाखाचा खर्च होत आहे. सरकारी अनुदानातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जात आहे. दुसरीकडे याच वार्डाला लागून असलेले वार्ड क्रमांक ९२-बाळकृष्णनगर तसेच वार्ड क्रमांक ११२ छत्रपती शिवाजीनगर या भागातील खुल्या जागा, क्रीडांगणे आणि  उद्यानासाठी आरक्षित जागांचे पार वाटोळे झालेले आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने मंत्री भुमरे राहत असलेल्या रामकृष्णनगराला लागुनच असलेल्या ३५ अलिशान वसाहतींची पाहणी केली. त्यात सर्वच खुल्या जागा आणि उद्यानांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे शिंदे सरकार या प्रभागांना पावणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Samruddhi Mahamargचे पाऊल पुढे; शिर्डी-भरवीर 80 किमीचा टप्पा पूर्ण

प्रत्येकाला वाटते आपल्या घरासमोर, परिसरात बाग, चिमुकल्यांसाठी चिल्ड्रन पार्क असावे, खेळण्यासाठी क्रीडांगणे असावीत त्यातून चांगला लाभ मिळावा, बागेत प्रवेश घेताक्षणी आपले अस्तित्व एकदम उत्फुल्लतेने भरून निघावे, आपल्याही परिसरात बाग असल्यास त्या ठिकाणी विहंगम दृश्य निर्माण व्हावे. ज्याद्वारे त्या ठिकाणाची शोभा वाढेल आणि वातावरण शुद्ध राहील. मात्र, अशा मनमोहक, सुंदर आणि नयनरम्य अशा बागेचे या प्रभागात कुठेही दर्शन झाले नाही.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'भूमिगत'च्या कामात घोळ; निकृष्ट कामाचा पुरावा

प्रतिनिधीने भुमरे राहत असलेल्या रामकृष्ण नगराला लागुनच असलेल्या आरबी हिल्स, नाथप्रांगण, आनंद सोसायटी, एमराॅल्ड सिटी, डेक्कन संस्कृती, कासलीवाल रानवारा, साराराजनगर, जयदुर्गा हाउसिंग सोसायटी, मयुर टेरेसेस, साहस सोसायटी, सरस्वतीनगर, संघर्ष सोसायटी, मेहरनगर, भगतसिंगनगर, मोरेश्वर हाउसिंग सोसायटी, विजयनगर व अन्य भागांची पाहणी केली. या वसाहतीतील खुल्या जागा, क्रिडांगणांची आणि उद्यानांसाठी राखीव असलेल्या जागांचे वर्णन करताना देखील व्यवस्थेला लाज वाटावी, असे आहे. येथील सर्वच भागात सदाहरित वृक्ष, फुलझाडे, विविध प्रकारची झुडुपे, बसण्यासाठी बाकडे, एखादे छोटेसे मंदीर आणि छोटा जलाशय इ. बाबी कोणत्याही बागेत पाहायला मिळणे अपेक्षित आहे. मात्र सगळीकडेच पडक्या भिंती, मोडके प्रवेशद्वार आणि आत रानटी झाडेझुडपे आणि आडोशाला उनाडटप्पूंचा गराडा असे चित्र दिसले.

Sambhajinagar
Nashik : गटविकास अधिकाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 5 हजार मजूर अडचणीत

एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे पैठणचे आमदार तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या घरासमोर शिंदे सरकार पावले अन् लाखो रूपयाचा खर्च करून खुल्या पटांगणाचे भाग्य उजळले आहे. मात्र केवळ मंत्र्यांच्या घरासमोरच लाखो रुपये खर्च केले जात आहेत. आता शिंदे सरकार इतर प्रभागातील ओस पडलेल्या बागांच्या विकासासाठी पावणार का? पालकमंत्री बागांच्या विकासकामासाठी शिंदे सरकारकडे धावणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com