पंचगंगा प्रदूषण : सीईटीपी प्रकल्पांची कामे आणि प्रत्यक्ष वापर तपासणार

राज्यातील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर आणि अपूर्ण कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
Pankaja Munde
Pankaja MundeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर परिसरातील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (सीईटीपी) कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रकल्पांच्या कामांना उशीर का झाला, याचा अहवालही सादर करण्यास त्यांनी सांगितले.

Pankaja Munde
Gargai-Dev River Link: सिन्नरच्या दुष्काळावर 13,500 कोटींच्या नदीजोड प्रकल्पाचा उतारा

कोल्हापूरसह राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीईटीपी प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर आणि या प्रकल्पांचा वापर करणे अपेक्षित असलेल्या औद्योगिक घटकांची संख्या व प्रत्यक्ष वापर करणाऱ्या उद्योगांची माहिती घेऊन पाहणी करावी. रेड झोन, साखर कारखाने आणि प्रदूषित क्षेत्रातील सीईटीपी प्रकल्पांचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोल्हापूर शहर, इचलकरंजी तसेच नदी परिसरातील नगरपालिका, ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्रांतून नदीत जाणाऱ्या सांडपाण्याचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावेळी नदी प्रदूषणासंदर्भातील माहितीचे सादरीकरण केले.

Pankaja Munde
Maharashtra River Linking: दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार

सीईटीपी आणि पाइपलाइनची कामे एकाच वेळी

प्रस्तावित नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या कामात पंचगंगा नदीचा प्राधान्याने समावेश करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या मंजूर सीईटीपी प्रकल्पांची यांत्रिकीकरणाची कामे तसेच त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू ठेवावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित यंत्रणांना आदेश जारी करून त्याची प्रत सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.

औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावताना ते शेतजमिनी, नाले किंवा अन्य मार्गाने पुन्हा नदीत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासून न थांबता त्याची प्रत्यक्ष विल्हेवाट, वाहतुकीदरम्यान होणारी गळती आणि अनधिकृत विसर्गावरही देखरेख ठेवण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.

Pankaja Munde
Mumbai-Goa Highway: माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी खुली करणार; रेल्वे उड्डाणपुलाचे 75 टक्के काम पूर्ण

चार एसटीपी प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

कोल्हापूरच्या परिघीय शहरी गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी सांगितले. विविध विभागांच्या समन्वयातून या गावांसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याच्या शक्यतांचा विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Pankaja Munde
Maharashtra Irrigation Projects: राज्यातील नदीजोड प्रकल्पांना गती; सिंचन प्रकल्पांबाबत काय दिले मुख्यमंत्र्यांनी निर्देश?

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही राज्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. अनेक प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केल्यानंतरही पाण्याची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे सांगून, केंद्रीभूत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत का, याची पाहणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रक्रिया न करता औद्योगिक सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार आदी उपस्थित होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूर महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

Pankaja Munde
कोल्हापूर, वसईसाठी काय केली सरकारने घोषणा?

Key Points

  • पंचगंगा नदी प्रदूषणावर सरकारचा आढावा,

  • सीईटीपी प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश,

  • प्रकल्पांना उशीर का झाला, याचा अहवाल मागवला,

  • राज्यातील सीईटीपी प्रकल्पांची क्षमता आणि प्रत्यक्ष वापर तपासणार,

  • आठ दिवसांत पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश,

  • सीईटीपी आणि पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना,

  • सांडपाण्याची विल्हेवाट आणि अनधिकृत विसर्गावरही देखरेख ठेवणार,

  • कोल्हापूर महापालिकेच्या चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश,

  • परिघीय शहरी गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र बैठक घेणार,

  • पुढील आठवड्यात कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणावर बैठक होणार.

Tendernama
www.tendernama.com