.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नातेपुते (Natepute) : धर्मपुरी- शिंदेवाडी- कुरबावी राज्यमार्ग क्रमांक ९७ हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची खडी उचकटलेली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धर्मपुरी ते शिंदेवाडी या मार्गावरील श्री गणेश मंदिरापर्यंत साडेपाच किलोमीटरसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी रस्त्याच्या सुधारणांसाठी मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात शिंदेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.
सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शिंदेवाडी हे प्रतिष्ठित आणि बागायतदारांनी वसलेले गाव आहे. या ठिकाणची शेती पाहण्यासारखी आहे. परंतु रस्ते मात्र संपूर्ण जिल्ह्यात अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. धर्मपुरी- शिंदेवाडी- कुरबावी राज्यमार्ग क्रमांक ९७ हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची खडी उचकटलेली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक वर्षांपासून मागणी करूनही या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही; परंतु अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धर्मपुरी ते शिंदेवाडी या मार्गावरील श्री गणेश मंदिरापर्यंत साडेपाच किलोमीटरसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी रस्त्याच्या सुधारणांसाठी मंजूर झाला आहे. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीने या रस्त्याचे काम घेतलेले आहे. प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे. मात्र काम सुरू झाल्यापासून टेंडरमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकही काम झालेले नाही. मुरूम आणि डबर, दगडाचा पत्ता नाही. सर्वत्र माती टाकलेली दिसून येते.
याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूजकडे अनेकदा तक्रारी केल्या. या तक्रारींवर उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग क्रमांक एकचे लक्ष्मण ढाके, शाखा अभियंता कोल्हे यांनी समक्ष भेटी देऊन ग्रामस्थांच्या तक्रारींचे निरसन करून गेले. त्यानंतर प्रत्यक्षात साइड पट्टीसाठी आणलेला मुरूम मुख्य रस्त्यावर पुन्हा टाकलेला आहे. ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कोणत्याही अधिकाऱ्यांना जुमानत नाही, असे चित्र आहे.
शिंदेवाडी हे बागायती गाव आहे. येथून माळशिरस, फलटण, बारामती या तालुक्यांतील साखर कारखान्यांना लाखो टन ऊस गळितासाठी जात असतो. या खराब रस्त्यामुळे उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस रस्त्यावर वाहने उभी असतात. मात्र संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने या रस्त्याचे काम निकृष्टपणे सुरू ठेवले आहे. खराब मुरूम उचलून त्या ठिकाणी टेंडरमध्ये सांगितल्याप्रमाणे डबर टाकणे गरजेचे आहे.
- चंद्रकांत शिंदे, माजी सरपंच, शिंदेवाडी