
मुंबई (Mumbai) : शिंदे सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेत झालेला ६ हजार कोटींचा रस्ते घोटाळा आणि २६३ कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघडकीस आल्यानंतर अद्यापही त्याचा चौकशी अहवाल बाहेर आलेला नाही. त्यामुळे मुंबईला लुटणाऱ्या घोटाळेबाजांची निःपक्षपाती आणि उघड चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महापालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली.
आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मुंबईच्या विविध विकासकामांबाबत चर्चा केली. शिंदे सरकारच्या काळात रस्ते कामात ६ हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर या टेंडरची किंमत ९०० कोटींनी कमी झाली, तर स्ट्रीट फर्निचरचे टेंडर रद्द करण्यात आले. मात्र या घोटाळ्यांना जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून काय कारवाई केली याबद्दल महापालिका कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे मुंबईची लूट करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. राज्य सरकारकडे महापालिकेच्या विविध खात्यांची तब्बल 16 हजार कोटींची थकबाकी आहे. याचा मोठा फटका महापालिकेच्या आर्थिक स्थितीला बसत आहे. त्यामुळे सरकारकडून रखडलेली देणी घ्यावीत, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यातून आर्थिक डबघाईला आलेल्या 'बेस्ट'ला मदत करावी, जेणेकरून 'बेस्ट' मुंबईकरांना चांगली सेवा देऊ शकेल, असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा कोस्टल रोड आम्ही सरकारमध्ये असतो तर डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत आला असता. मात्र शिंदे सरकारने कोस्टल रोडच्या कामात दिरंगाई केल्यामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शिल्लक कामे तातडीने करून प्रकल्प लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. शिवाय वरळीसह मुंबईतील अनेक प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यामध्ये वरळीमध्ये कोल्हापूर भवन, तेलुगू भवन बांधावे, रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. महापालिकेकडून वरळीतील बौद्ध विहार पाडण्यासंदर्भात वारंवार नोटीस दिल्या जात होत्या, मात्र बौद्ध विहारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत पाडकाम होणार नाही. मार्कंडेश्वरनगर येथून जाणाऱ्या नवीन रस्त्यामुळे वरळीतील रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव मागवला जाणार आहे.
वरळी येथील हिंदू स्मशानभूमीच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. मुंबई आणि दक्षिण प्रभागात पाण्याचा गंभीर प्रश्न असून त्यासाठी पाणी ऑडिट करून नियोजन केले जाणार आहे. सेंच्युरी मिलच्या जागेवर बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या मिल कामगार वसाहतीमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न म्हाडा आणि महापालिका यांच्यातील समन्वयाने मार्गी लावण्यात येणार आहे, असे आश्वासन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.